विनोदी शैलीमध्ये किर्तन करून आणि त्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर स्वतःच्या शैलीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातात. व्यसनाधीन तरुणाई , कष्टकरी शेतकरी, लग्न, कर्जबाजारीपणा, घरात होणारी सासू-सुनेचे भांडणं, मुलांचं लग्न झाल्यानंतर त्याच्या आई-वडिलांची होणारी परवड असे अनेक विषय ते आपल्या किर्तनातून मोठ्या ताकतीनं मांडतात.
लग्न साध्या पद्धतीनं करा असा संदेश देखील इंदुरीकर महाराज आपल्या किर्तनातून देत असतात. आजच्या काळामध्ये लग्न म्हणजे एक प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. यामध्ये सामान्य कुटुंब भरडून निघत आहेत, ज्यांच्याकडे पैसे नाहीत ते देखील लोकांना दाखवण्यासाठी कर्ज काढून आपल्या मुला-मुलींचे लग्न मोठ्या थाटात करतात आणि कर्जबाजारी होतात.
मात्र असं करू नका, लग्न साध्या पद्धतीनं करा असा संदेश देखील इंदुरीकर महाराज आपल्या किर्तनातून देत असतात. काल (ता.४) इंदुरीकर महाराज यांच्या मुलीचा साखरपुडा पार पडला आहे. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत.
इंदुरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा साखरपुडा संगमनेरमध्ये पार पडला.या कार्यक्रमात राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. त्यामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार राजाभाऊ वाजे आणि विधान परिषद आमदार सत्यजित तांबे यांचा समावेश होता. या साखरपुड्यात सत्कार, हार, तुरे, शाल न स्विकारता हा कार्यक्रम पार पडला.
इंदुरीकर महाराजांचा जावई नक्की आहे तरी कोण ?
इंदुरीकर महाराज यांचे जावई साहिल चिलाप हे बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती समोर येत आहे. साहिल चिलाप हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे येनेरे गावचे रहिवासी आहेत. ते उच्च शिक्षित असून, गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती आहे. सध्या ते नवी मुंबईत व्यवसायानिमित्त वास्तव्याला आहेत. साहिल चिलाप यांच्या कुटुंबाचा ट्रान्सपोर्टचा मोठा व्यवसाय असून त्यांच्या मालकीचे अनेक ट्रक आणि व्यावसायिक वाहने असल्याची माहिती समोर आली आहे.