समाज प्रबोधनकार, कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे कायम आपल्या भन्नाट कीर्तन आणि विनोदी शैलीसाठी चर्चेत असतात. समाजातील विविध विषयांवर जनजागृती करणारे इंदुरीकर महाराज यांची कीर्तने नेहमीच लोकांना विचार करायला लावतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मुलीच्या साखरपुड्यामुळे इंदुरीकर महाराज चांगलेच चर्चेत आहेत.
काही दिवसांपूर्वीच त्यांच्या लेकीचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात कपड्यावरून ट्रोल करण्यात आलं. लेकीच्या साखरपुड्यामधील कपड्यांवर झालेल्या टीकेमुळे इंदुरीकर महाराज यांनी व्यथित होऊन कीर्तन सोडण्याचा निर्णयावर भाष्य केलंय. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये इंदुरीकर महाराज म्हणतात, 'आमची पोरं लहान असताना आठ-आठ दिवस माझी त्यांच्याशी भेट होत नसे. मी लोकांसाठी धावत राहिलो. पण आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगावरच्या कपड्यांवर कमेंट्स करत आहेत. यापेक्षा वाईट काय असेल? चार दिवसांपासून माझ्या मुलीच्या साखरपुड्याचे कपडे चर्चेत आहेत. पण तिच्या बापाला काहीही विचारत नाहीत'.
'तुमच्याही मुली असतील. तिच्या कपड्यांवर कोणी बोललं तर तुम्हाला काय वाटेल? साखरपुड्यात कपडे मुलीकडून घेतले की नवरदेवाकडून? मग त्यावर माझा काय दोष? एवढी तरी लाज असावी ना! 31 वर्ष मी कीर्तन केलं, लोकांना प्रेरणा दिली, उपदेश केला पण आता मजा उरली नाही.
लोकांच्या शिव्या खात खात आयुष्य गेलं पण आता हे व्यक्तिगत पातळीवर गेलं आहे. मी आजही समर्थ आहे उत्तर द्यायला पण कुटुंबावर बोट गेलं की सहन होत नाही'. मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे. मी अजून आहे ना. पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही. आणि ही अक्कल इंदुरीकरलाच आली पाहिजे. त्याने कीर्तन बंदच केले पाहिजे.
खरे की खोटे? तुम्ही काहीच बोलत नाही. हे त्याने बंद केले पाहिजे. त्याला लाज वाटली पाहिजे की, आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंदुरीकरने फेटा ठेवून द्यावा. त्याचे त्याने चांगले जगावे. आम्ही दोन तीन दिवसापासून विचार करत आहोत, दोन तीन दिवसात मी घेणारे निर्णय. पण मजा नाही राहिली त्याच्यात आता, या शब्दांत इंदुरीकर महाराजांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या.