गेल्या काही महिन्यांपासून मतदार यादीतील घोळ राहुल गांधी पुराव्यासहित दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. काल पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर मतदार यादीत घोटाळ्याचा आरोप करत हायड्रोजन बॉम्ब फोडला होता. यावेळी त्यांनी एकाच व्यक्तीचा फोटोचा वापर २२ वेगवेगळ्या नावांनी मतदान करण्यासाठी करण्यात आला होता आणि ती दुसरी कोणी नसून ब्राझीलियन मॉडेल असल्याचे राहुल गांधींनी सांगितले होते.
राहुल गांधींच्या या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली. आता स्वत: त्या ब्राझीलियन मॉडेलने एक व्हिडीओ प्रसिद्ध करुन यावर प्रतिक्रिया दिली आहे. सदर ब्राझीलियन मॉडलचं नाव लारिसा असल्याचं समोर आलं आहे.
लरिसा हिने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत आपली ओळख उघड केली. ती म्हणाली, "नमस्ते इंडिया, मला अनेक भारतीय पत्रकारांनी व्हिडिओ करण्यासाठी विनंती केली, म्हणून मी हे बोलत आहे. माझा भारताच्या राजकारणाशी काहीही संबंध नाही. मी कधीच भारतात आले नाही. मी तीच रहस्यमयी ब्राझिलियन महिला आहे. मी ती गूढ मॉडेल आहे, आता मी फक्त माझ्या मुलांच्या मागे वेळ घालवत आहे. भारतात जे होत आहे, ती मी नाही, तो फक्त माझा फोटो आहे. तुम्हाला वाटते का की मी भारतीय दिसते, मला वाटते मी मेक्सिकन सारखी दिसते, असे ती म्हणाली.
लरिसाने स्पष्ट केले की ती पूर्वी मॉडेलिंग करत होती, पण आता ती डिजिटल इन्फ्लुएन्सर म्हणून काम करते. तिच्या मते, तिचे छायाचित्र 'स्टॉक इमेज' म्हणून उपलब्ध होते, जे कदाचित कोणीतरी खरेदी केले आणि त्याचा गैरवापर केला.
सध्या ती मॉडेलिंगपासून दूर असली तरी, या वादामुळे तिला मिळत असलेल्या भारतीय प्रेमाबद्दल आणि सहानुभूतीबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. मतदार यादीतील घोटाळ्याचा तिच्यावर कोणताही परिणाम नाही, परंतु आपल्या छायाचित्राचा गैरवापर झाल्याचे तिने स्पष्ट केले आहे.