हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारवर संकटाचे ढग दिसत असतानाच, आता ईशान्येकडील आसाममध्येही पक्षाला मोठा धक्का बसला आहे. येथे काँग्रेसचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष राणा गोस्वामी यांनी पक्ष सोडला असून ते भाजपचे कमळ हाती घेऊ शकतात. जोरगाट येथील ज्येष्ठ नेते राणा गोस्वामी यांच्याआधीही अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे.
नुकतेच आणखी एक कार्यकारी अध्यक्ष कमलाख्या डे पुरकायस्थ यांनीही काँग्रेसला राम-राम ठोकला होता. याशिवाय आमदार बसंत कुमार दास यांनीही भाजप सरकारला पाठिंबा दिला होता. अशाप्रकारे गेल्या काही दिवसांतच आसाममधील तीन मोठ्या नेत्यांनी काँग्रेसला सोडडचिठ्ठी दिली आहे.
केसी वेणुगोपाल यांच्या नावे लिहिलेल्या एका पत्रात राणा गोस्वामी यांनी म्हले आहे, "मी आसाम काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. याशिवाय काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता म्हणूनही जबाबदारी सोडत आहे." त्यांनी भाजपाच्या केंद्रीय नेत्यांची आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचीही भेट घेतल्याचे बोलले जाते आहे. सरमा नुकतेच दिल्लीला गेले होते.
यावेळी लोकसभा उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. महत्वाचे म्हणजे, राणा गोस्वामी यांना भाजपकडून उमेदवारी मिळू शकते, यामुळेच ते भाजपमध्ये जाणार आहेत, अशीही चर्चा सुरू आहे.
तत्पूर्वी, सरमा यांनी मंगळवारीच म्हटले होते की, राणा गोस्वामी हे जोरहाटमधील एक मजबूत नेते आहेत. जर ते आलेच तर आम्ही त्यांचे पक्षात स्वागतच करू. गोस्वामी हे दोन वेळा काँग्रेसचे आमदार राहिले आहेत. यामुळे त्यांना 2026 च्या विधानसभा निवडणुकीतही जोरहाट मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते.