किरकोळ वादातून एका पतीने आपल्या विभक्त झालेल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे त्यानंतर मृतदेहासोबत सेल्फी घेऊन तो फोटो आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर देखील ठेवला. 'तिने माझा विश्वासघात केला,' असे त्याने या स्टेटसवर लिहिले होते. या घटनेनं तामिळनाडूमध्ये खळबळ उडाली आहे. ही क्रूर घटना रविवारी दुपारी घडली.
नेमकं प्रकरण काय ?
श्रीप्रिया नामक महिला तामिळनाडूमधील कोईम्बतूर येथील एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. ती तिचा पती बालामुरुगन याच्यापासून विभक्त राहत होती. बालामुरुगन तिच्याशी भेट घेण्यासाठी एका महिला वसतिगृहात आला होता. त्यांची भेट झाल्यानंतर त्यांच्यात जोरदार भांडण सुरू झाले. या भांडणादरम्यान बालामुरुगनने अचानक त्याच्याजवळील विळा बाहेर काढला आणि वसतिगृहामध्येच श्रीप्रियावर वार करून तिची हत्या केली.
या हल्ल्यामुळे वसतिगृहातील रहिवासी घाबरून बाहेर पळाले. मात्र, आरोपी बालामुरुगन घटनास्थळीच थांबून राहिला आणि त्याने पोलिसांची वाट पाहिली. पोलिसांनी सांगितले की, त्याने हत्येनंतर श्रीप्रियाच्या मृतदेहासोबत सेल्फी काढला आणि तो 'विश्वासघाताचा' दावा करत व्हॉट्सॲप स्टेटसवर अपलोड केला. पोलिस घटनास्थळी दाखल होताच, त्याला ताबडतोब अटक करण्यात आली असून हत्येसाठी वापरलेले शस्त्रही हस्तगत करण्यात आले आहे.
प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, बालामुरुगनला संशय होता की त्याची पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंधात होती, याच संशयातून त्याने हे भयंकर कृत्य केल्याचे स्पष्ट होत आहे.