गोव्यात पार पडलेल्या ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्वसाच्या (इफ्फी) समारोप समारंभात अभिनेता रणवीर सिंहने ‘कांतारा : चाप्टर 1’च्या क्लायमॅक्समध्ये दाखवलेल्या चावुंडी देवीचा अपमान केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ‘कांतारा: चाप्टर 1’मध्ये दाखवलेल्या चावुंडी देवीचा उल्लेख ‘भूत’ म्हणून केल्याने रणवीरवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
‘इफ्फी’च्या मंचावर रणवीर सिंहने चावुंडी देवीची नक्कल केली आणि कोटितुलू समुदायासाठी पूजनीय असलेल्या या दैवाचा उल्लेख त्याने ‘स्त्री भूत’ असा केला होता. त्याने डोळे मोठे करून आणि जीभ बाहेर काढून देवीची नक्कल केली होती.
याप्रकरणी हिंदू जनजागृती समितीने रणवीरविरोधात तक्रार दाखल केली आहे. तुलू समुदायात चावुंडी देवीला खूप मानलं जातं. अशा देवीचं अपमानास्पद पद्धतीने चित्रण किंवा वर्णन करणं म्हणजे त्यांचा अनादर करण्यासारखंच आहे. अशा कृत्यामुळे जनतेत आक्रोश पसरू शकतो आणि शांती भंग होऊ शकते, असं हिंदू जनजागृती समितीने तक्रारीत म्हटलंय.
यादरम्यान आता रणवीरने जाहीर माफी मागितली आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, असं त्याने स्पष्ट केलंय. यासंदर्भात रणवीरने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.
रणवीर सिंहची सोशल मीडियावरील पोस्ट -
‘कांतारा या चित्रपटातील ऋषभच्या अभूतपूर्व परफॉर्मन्सला अधोरेखित करण्याचा माझा हेतू होता. ऋषभने तो ठराविक सीन ज्या जबरदस्त पद्धतीने सादर केला, त्यासाठी किती मेहनत करावी लागते हे मला माहित आहे. त्यासाठी मी त्याचं खूप कौतुक करतो. आपल्या देशातील प्रत्येक संस्कृती, परंपरा आणि विश्वासाचं मी नेहमीच मनापासून आदर करतो. माझ्यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो’, अशा शब्दांत रणवीरने दिलगिरी व्यक्त केली.