बंगळुरूमध्ये एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. गीझर गॅसच्या विषबाधेने ४८ वर्षीय व्यक्ती राजूचा मृत्यू झाला आहे. ज्यावेळी गीझर सुरू असतो तेव्हा कार्बन मोनोऑक्साइड नावाचा विषारी वायू बाहेर पडतो. हा वायू गंधहीन आणि रंगहीन आहे आणि मर्यादित जागेत श्वास घेतल्यास तो प्राणघातक ठरू शकतो. हा वायू राजू यांच्या मृत्यूचे कारण बनला. पतीचा मृत्यू झाल्यानंतर काही वेळातच ४२ वर्षीय पत्नी मीना राजूनेही आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू हा व्यवसायाने ड्रायव्हर होता. मीना बंगळुरूमधील एका खाजगी बँकेत काम करत होती. या जोडप्याचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि त्यांना एक मुलगा आहे. शुक्रवारी संध्याकाळी कामावरून घरी परत येताच राजू आंघोळीसाठी गेला होता. बराच वेळ होऊनही तो बाहेर आला नाही तेव्हा त्याच्या मुलाने त्याला हाक मारली. मात्र, वारंवार विचारपूस करूनही बाथरूममधून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मुलाने जवळच्या लोकांना माहिती दिली. दरवाजा तोडल्यानंतर लोकांना बाथरूममध्ये राजू मृतावस्थेत आढळला.
मुलाने त्याच्या आई मीनाला फोन केला आणि तिला घरी येण्यास सांगितले. यावेळी मीना या ऑफिसमधून निघून आल्या, पण घरी जाण्याऐवजी त्या जक्कासंद्रा येथे पोहोचल्या, तिथे या दाम्पत्याच्या नवीन घराचे काम सुरू होते. त्यानंतर मीना यांनी तिथे आत्महत्या केली. मीना यांनी एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, त्या त्यांच्या पतीशिवाय एक मिनिटही राहू शकत नाही. राजू नेलामंगला येथे भाड्याच्या घरात राहत होता आणि तेथील बाथरूममध्ये व्हेंटिलेशन नव्हते. नेलामंगला टाउन पोलिसांनी राजूच्या मृत्यूप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.