अभिनेता राजपाल यादव नंतर आता अभिनेता श्रेयस तळपदे अडचणीत आला आहे. श्रेयस तळपदेसह १२ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मैनपुरीतील भोगांवची आहे.
नेमकं प्रकरण काय ?
मिळालेल्या माहितीनुसार , १० फेब्रुवारी रोजी मैनपुरीच्या भोगांव पोलीस ठाण्यात अभिनेता श्रेयस तळपदेसह १२ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. भोगांवच्या मोहल्ला मिश्राणा येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने गुंतवणुकीच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
अभिनेत्याने त्याच्या साथीदारांसह शहरातील मोहल्ला मिश्राणा येथील मुंबई बँकेच्या ब्रांचमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली ग्रामस्थांची लाखो रुपयांची फसवणूक केली असा आरोप करण्यात आला. ज्या 12 जणांविरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे त्यात श्रेयस तळपदे सह समीर अग्रवाल, सानिया अग्रवाल, आरके सेट्टी (फंड मॅनेजर), संजय मुदगिल, शबाब हुसेन, नरेंद्र नेगी, पंकज अग्रवाल, सुप्रिया, अनुज जैन, अजय श्रीवास्तव आणि अरविंद त्रिपाठी यांच्या नावांचा समावेश आहे.
दाखल केलेल्या एफआयआरच्या प्रतीनुसार, १४ जणांनी न्यायालयात तक्रार दाखल केली की, सागा ग्रुपचे संचालक समीर अग्रवाल आणि त्यांची पत्नी सानिया अग्रवाल यांनी २०१५ मध्ये त्यांच्या परिसरात एलयूसीसी बँकेची शाखा उघडली. त्यात शेकडो लोकांनी गुंतवणूक केली. परंतु जेव्हा लोकांनी त्यांचे पैसे परत मागितले तेव्हा समीरने ते परत करण्यास नकार दिला आणि त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. शिवाय, २०२४ मध्ये बँकेने आपले दरवाजे बंद केले.
पीडितांचे म्हणणे आहे की त्यांच्याकडे त्यांच्या ठेवींसाठी सर्व कागदपत्रे आहेत. लाखो रुपये बँकेत अडकले आहेत. बँक काम करत नसल्याने तेही त्रस्त होते. त्यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. या बँकेवर केवळ मैनपुरीमध्येच नव्हे तर उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील शहरे आणि गावांमध्येही लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.