एक Email अन् झटक्यात 12 हजार भारतीय बेरोजगार,  पहाटे 6 वाजता...
एक Email अन् झटक्यात 12 हजार भारतीय बेरोजगार, पहाटे 6 वाजता...
img
वैष्णवी सांगळे
कॉर्परेट आणि आयटी क्षेत्रामध्ये मागील अनेक आठवड्यांपासून ज्या गोष्टीची भीती व्यक्त केली जात होती तीच आता घडली असून 'ओरॅकल' या मल्टीनॅशनल कंपनीने मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. 'ओरॅकल' मध्ये काम करणाऱ्या विविध विभागांमधील कर्मचाऱ्यांना सकाळी 5 ते 6 वाजण्याच्या सुमारास नोकरीवरुन काढून टाकण्यात आल्याचे ईमेल्स आले आहेत. या ईमेल्समध्ये कर्मचाऱ्यांना तुम्ही ज्या पदावर काम करत आहात ते पद कंपनीने या क्षणापासून काढून टाकलं असून तुम्हाला नोकरीमधून कमी करण्यात येत आहे, असं कळवलं आहे. 



आधीच नोकऱ्या मिळत नाहीत त्यामध्ये आहे ती नोकरी गेल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. रात्रंदिवस मेहनत केल्यानंतरही एक झटक्यात कंपनीने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. भारतीय आयटी क्षेत्रासाठी आजची सकाळ ब्लॅक वेन्सडे ठरली आहे. ओरॅकल या जागतिक कीर्तीच्या कंपनीने जगभरातील आपल्या एकूण वर्कफोर्सपैकी तब्बल १८ टक्के म्हणजेच ३०,००० कर्मचाऱ्यांना एका फटक्यात बाहेरचा रस्ता दाखवला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या महाकाय कपातीत भारताचा आकडा सर्वाधिक असून, देशातील सुमारे १२,००० आयटी प्रोफेशनल्सनी आपली नोकरी गमावली आहे.

या कर्मचारी कपातीची पद्धत अत्यंत धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी होती. अनेक कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर आपलं गाऱ्हाणं मांडताना सांगितलं की, पहाटे ५ ते ६ च्या सुमारास त्यांना 'ओरॅकल लीडरशिप'कडून एक ईमेल प्राप्त झाला. ज्यांनी २०-२० वर्षे कंपनीला दिली, त्यांनाही कोणतीही पूर्वसूचना न देता "तुमची जागा आता कंपनीत redundant झाली आहे," असं सांगण्यात आलं. ईमेल वाचून कर्मचारी सावरतात तोच त्यांचे लॅपटॉप एक्सेस आणि इंटरनल सिस्टिम्स बंद करण्यात आल्या होत्या.

पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या 'ओरॅकल'ने भारतातील सुमारे 12 हजार कर्मचाऱ्यांना असे ईमेल्स पाठवले असून त्यांना तात्काळ प्रभावाने कामावरून कमी केले आहे. या कपातीचा फटका बसलेल्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारेच पीटीआयने हे वृत्त दिले आहे. याहून अधिक मोठी बातमी म्हणजे ही नोकरकपात अशी थांबणार नसून 'ओरॅकल'कडून पुढील महिन्यात नोकरकपातीची दुसरी फेरी होऊ शकते. अनेक देशांमध्ये सक्रीय असलेल्या 'ओरॅकल' कंपनीने जगभरात 30 हजार कर्मचाऱ्यांना कमावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group