पंजाबमध्ये अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांच्या निवासस्थानी पहाटे छापा टाकला. सूत्रांनुसार गुरुग्राम, पंजाब आणि हरियाणासह अंदाजे आठ ते नऊ ठिकाणी हे छापे टाकले जात आहेत. यात अशोक मित्तल आणि त्यांच्या मुलाशी संबंधित ठिकाणांचा समावेश आहे. ईडीने अशोक मित्तल यांच्या जालंधर येथील निवासस्थानांवरही छापा टाकण्यात आला आहे. या कारवाईनंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी याप्रकरणी भाजपावर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर मान यांनी लिहिलं की, "भाजपाद्वारे पंजाब निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांचं घर आणि युनिव्हर्सिटीमध्ये ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल आहे. आम्ही ती पानं नाही जी फांदीवरून तुटून खाली पडतील, वादळांना सांगा की, त्यांनी आपल्या मर्यादेत राहावं."
वृत्तसंस्था 'एएनआय' (ANI) च्या माहितीनुसार, एका अधिकाऱ्याने सांगितलं की, फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट (FEMA) च्या उल्लंघनाप्रकरणी ईडीने आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार आणि वरिष्ठ सभागृहातील उपनेते डॉ. अशोक कुमार मित्तल यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापेमारी केली आहे. यामुळे राजकारण तापलं आहे.
अशोक मित्तल कोण आहेत?
अशोक मित्तल यांचा जन्म पंजाबमधील जालंधर येथे झाला. त्यांच्या वडिलांनी 'लवली स्वीट्स' नावाचे एक छोटे मिठाईचे दुकान सुरू केले होते. त्यानंतर अशोक मित्तल यांनी आपल्या भावांसोबत या व्यवसायाचा विस्तार केला. आणि ते जालंधरमधील सर्वात प्रसिद्ध मिठाईचे दुकान बनले आहे. मिठाईच्या व्यवसायातून मिळालेल्या नफ्यातून त्यांनी २००५ मध्ये 'लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी'ची स्थापना केली. जी आज देशातील सर्वात मोठ्या खासगी विद्यापीठांपैकी एक मानली जाते. अशोक मित्तल यांनी गुरु नानक देव विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना त्यांनी एक संस्था स्थापन केली आहे. तेथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.