मृत्यूची भीती दाखवून 'अवतार पूजा'चा बनाव; भोंदू अशोक खरातने आपल्याच सीएला घातला ८.७६ कोटींचा गंडा!
मृत्यूची भीती दाखवून 'अवतार पूजा'चा बनाव; भोंदू अशोक खरातने आपल्याच सीएला घातला ८.७६ कोटींचा गंडा!
img
Jayshri Rajesh



नाशिक:  भोंदूगिरी आणि लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे आधीच गजाआड असलेल्या स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात याच्या अडचणीत आणखी मोठी वाढ झाली आहे. खरातने त्याचे आर्थिक व्यवहार सांभाळणारे सीए ललित पोफळे यांना आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवून तब्बल ८ कोटी ७६ लाख रुपयांना गंडवल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून खरातच्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

अशोक खरातने सीए ललित पोफळे यांना त्यांच्या आई-वडिलांचा 'अकाली मृत्यूयोग' असल्याचे सांगून प्रचंड मानसिक दडपणाखाली आणले होते. आई-वडिलांचा हा अटळ मृत्यू टाळायचा असेल, तर विशेष 'अवतार पूजा' आणि मोठे धार्मिक विधी करावे लागतील, असे खरातने पोफळे यांना पटवून दिले. खरातच्या या भूलथापांना बळी पडून पोफळे यांनी या खोट्या पूजा आणि विधींच्या नावाखाली वेगवेगळ्या टप्प्यांवर तब्बल ८ कोटी ७६ लाख रुपये खरातला दिले. 

ललित पोफळे हे खरातच्या मिरगाव येथील 'शिवनिका ट्रस्ट'चे विश्वस्त होते आणि त्याचे आर्थिक व्यवहार पाहत होते. खरातने या जवळच्या संबंधांचा गैरफायदा घेत आपल्याच अत्यंत विश्वासू सहकाऱ्याला लुटून हा मोठा गुन्हा केला. ललित पोफळे यांची यापूर्वी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती

या चौकशीदरम्यान खरातच्या आर्थिक साम्राज्याविषयी आणि त्याने केलेल्या फसवणुकीविषयी महत्त्वाची माहिती समोर आली. पोफळे हे खरातच्या ट्रस्टचे महत्त्वाचे घटक असल्याने, या नव्या गुन्ह्यामुळे खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लैंगिक शोषणाचे ८ तर आर्थिक फसवणुकीचे ९ गुन्हे 

अशोक खरातवर आतापर्यंत लैंगिक शोषणाचे ८ आणि आर्थिक फसवणुकीचे ९ गुन्हे दाखल झाले आहेत. धर्माच्या आणि अध्यात्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करून त्यांना लुटणे आणि महिलांचे शारीरिक शोषण करणे, अशी खरातची कार्यपद्धती असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 

अशोक खरातला २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी 

 या गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी एसआयटी आणि सरकारी वकिलांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. अशोक खरातच्या वकिलांनी पोलीस कोठडीच्या मागणीचा कडाडून विरोध केला. मात्र, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अशोक खरात याला २६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group