नवीन नासिक ( चंद्रशेखर गोसावी) :- पुन्हा एकदा सिडको परिसरामध्ये गुन्हेगारीने डोके वर काढले असून चार अल्पवयीन मुलांनी जुन्या सिडकोतील साईबाबा मंदिर परिसरामध्ये सुमारे दहा ते बारा गाड्यांची तोडफोड केल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली आहे. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे.
दोन दिवसांपूर्वीच शिवाजी चौकातील 23 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा सिडको परिसरात गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे. या नागरिकांनी घटनेची माहिती प्रभागाचे माजी नगरसेवक आणि शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांना दिली. त्यांनी त्वरीत तेथे जाऊन घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना कळविले.
शिवाजी चौकालगतच असलेल्या साईबाबा मंदिर परिसरात असणार्या श्रीकृष्ण मंदिर, राम मंदिर या ठिकाणी नागरिकांच्या घरासमोर असलेल्या गाड्या फोडल्या. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना उपलब्ध झाले असून त्या आधारे पोलिसांनी दोन विधीसंघर्षित बालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या ठिकाणी तीन चार चाकी, तर सहा ते सात दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. तसेच या परिसरातील नागरिकांच्या घरांवर देखील दगडफेक करण्यात आली आहे. या परिसरातून रात्रीच्या वेळी आपल्या घराकडे परतणार्या डिलिव्हरी बॉयला देखील मारहाण करून त्याच्या गाडीचे नुकसान या समाजकंटकांनी केले.
पोलीस या मुलांची कसून चौकशी करत असून इतर फरार संशयितांचा देखील पोलीस शोध घेत असल्याचे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले. ज्यावेळी या घटनेची माहिती अंबड पोलिसांना घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रमिला कावळे व सहकारी यांनी त्वरीत घटना स्थळी भेट दिली.
सिडको परिसरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे ही बाब निंदनीय आहे. साईबाबा चौकामध्ये झालेला प्रकार हा पूर्णपणे दहशत निर्माण करणारा होता. या संपूर्ण प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. जर सर्व आरोपींना अटक झाली नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन अंबड पोलीस ठाण्यासमोर केले जाईल.
- प्रवीण (बंटी) तिदमे
महानगर प्रमुख शिवसेना