रुग्णालयात घुसून महिला डॉक्टरसह सहा जणांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा धक्कदायक प्रकार घडला आहे. आणि त्याहून धक्कादायक बाब म्हणजे ही मुजोरी शिंदे गटाच्या एका नगरसेवकाने केली आसल्याची माहिती आहे. डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयातील ही घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टर, परिचारिका (नर्स) आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण व धक्काबुक्की करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रकारात शिवसेनेचे (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांचे सहकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी वाद घालत त्यांना मारहाण करत असल्याचे CCTV फुटेज समोर आले आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद निर्माण झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की, नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर हात उचलला. व्हायरल झालेल्या आणि पोलिसांच्या हाती लागलेल्या CCTV फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, रुग्णालयातील एक महिला डॉक्टर जेव्हा मदतीसाठी किंवा वरिष्ठांशी संपर्क साधण्यासाठी फोन लावण्याचा प्रयत्न करत होत्या, तेव्हा त्यांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून तो खाली पाडण्यात आला.
कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली. तसेच त्यांना धक्काबुक्की करत आल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे. नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांचे काही सहकारी या मारहाणीत सक्रियपणे सहभागी असल्याचे CCTV फुटेजमध्ये स्पष्टपणे कैद झाले आहे, ज्यामुळे हा प्रकार अधिक गंभीर बनला आहे.
या घटनेनंतर शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जर शासकीय रुग्णालयात लोकप्रतिनिधींकडूनच अशी वागणूक मिळत असेल, तर आम्ही सुरक्षित कसे राहणार?" असा संतप्त सवाल वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे.