निवृत्त न्यायमूर्ती राजेश चंद्र यांना विमान प्रवासादरम्यान खराब सीट दिल्याबद्दल राज्य ग्राहक आयोगाने एअर इंडियाला मोठा दंड ठोठावण्यात आलं आहे. राज्य ग्राहक आयोगाने एअर इंडियाला 23 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेवानिवृत्त न्यायमूर्तींना ४५ दिवसांत नुकसान भरपाईची रक्कम द्यावी लागेल, असेही सांगण्यात आले आहे.
14 जून 2022 रोजी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती राजेश चंद्रा आणि त्यांची पत्नी रेखा अग्रवाल यांनी दिल्ली ते सॅन फ्रान्सिस्कोला एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये 1.89 लाख रुपयांना इकॉनॉमी क्लासच्या दोन सीट बुक केल्या होत्या. त्यानंतर अतिरिक्त रक्कम भरून सीट इकॉनॉमी ते बिझनेस क्लासमध्ये अपडेट करण्यात आली.
मात्र बिझनेस क्लासच्या सीटची स्वयंचलित यंत्रणा खराब असल्याने या दाम्पत्याला मोठा त्रास सहन करावा लागला. त्यानंतर त्याविरोधात निवृत्त न्यायमूर्ती राजेश चंद्रा यांनी राज्य ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली. त्यानंतर राज्य ग्राहक आयोगाने एअर इंडियाला दंड ठोठावला आहे. सुनावणीनंतर राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष अशोक कुमार यांनी खराब सीट बदलणे हा प्रवाशांचा अधिकार आहे, असा निकाल दिला आहे.
आयोगाने म्हटले आहे की, एअरलाइन्सने 1.69 लाख रुपयांचे अतिरिक्त बिझनेस क्लास शुल्क 10 टक्के व्याजासह परत करावे. तसेच मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी २० लाख रुपये आणि खटल्याच्या खर्चापोटी २० हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.