नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाध्वज प्रतिष्ठापना सोहळ्याला आजपासून भक्तिमय वातावरणात प्रारंभ होत आहे. या निमित्ताने तीन दिवसीय धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले असून, ३१ ऑक्टोबर रोजी मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या सोहळ्यासाठी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. नेमके कोणते धार्मिक विधी पार पडणार आहेत आणि कसा असेल हा सोहळा, जाणून घेऊया.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या म हाध्वज प्रतिष्ठापना सोहळ्याला शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबरपासून प्रारंभ होत असून, यानिमित्त तीन दिवसीय धार्मिक विधी, ध्वजदंड प्रतिष्ठापना आणि भव्य नगरप्रदक्षिणेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. ३१) दुपारी १२ वाजून २ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुख्य धर्मध्वजारोहण होणार आहे.
शुक्रवारी सकाळी ८.१५ वाजता ध्वजदंड प्रतिष्ठापना सोहळा आणि नगरप्रदक्षिणेने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. यज्ञविद्या वाचस्पती वेदमूर्ती भालचंद्र एकनाथशास्त्री शौचे गुरुजी आणि यज्ञाचार्य पंडित वैभव दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने तीन दिवस धार्मिक विधी पार पडणार आहेत. पहिल्या दिवशी तीर्थपूजन, पंचाय प्रधान प्रदान, संकल्प, गणेशपूजन, नवग्रह रुद्र स्थापना, स्नपन विधान, नवग्रह देशदूत हवन, प्रतिष्ठापना हवन, धान्याधिवास आणि शय्याधिवास आदी विधी होणार आहेत. सायंकाळी श्री गोदावरीची प्रार्थना करण्यात येईल.
शनिवारी सकाळपासून स्थापित देवतांचे पूजन आणि विविध धार्मिक विधींना प्रारंभ होईल. सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत राष्ट्रपती आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संकल्प, गणेशपूजन, पंचार्घ्य सम र्पण व तीर्थपूजन होणार आहे. त्यानंतर दुपारी १२.०२ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुख्य सिंहस्थ महाध्वजारोहण करण्यात येईल. यावेळी गोदाआरती आणि प्रार्थनेचाही कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी प्रतिष्ठापना हवन, पूजन आणि गोदाआरतीने दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होईल.
रविवारी (दि.१) सकाळी प्रातः पूजन, उत्तरांग हवन, बलिदान, पूर्णाहुती, अवभूत स्नान, गोदाआरती, प्रार्थना आणि कर्मसमर्पण आदी विधी पार पडतील. या धार्मिक विधींनी तीन दिवसीय ध्वजदंड प्रतिष्ठापना सोहळ्याची सांगता होणार आहे. या सोहळ्याला नागरिक, भाविक, साधू-संत आणि पत्रकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे प्रमुख विश्वस्त सतीश शुक्ल, अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, उपाध्यक्ष दिलीप शुक्ल, वैभव दीक्षित, सरचिटणीस प्रतीक शुक्ल आणि कार्याध्यक्ष शेखर शुक्ल यांनी केले आहे.
एक लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता : महाजन
सिंहस्थ कुंभमळा धर्मध्वजारोहण सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली असून, या सोहळ्यासह सायंकाळच्या गोदा आरतीसाठी सुमारे एक लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कुंभमेळ्यात यंदा गर्दीचे सर्व विक्रम मोडले जातील, असा विश्वास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, तर त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी प्रशासनाकडून व्यापक नियोजन करण्यात आले आहे. साधू-महंतांकडून साधूग्रामचे काम अद्याप सुरू न झाल्याबद्दल नार जी व्यक्त केली जात आहे. याबाबत बोलताना महाजन यांनी साधूग्रामसह कुंभमेळ्याची सर्व कामे नियोजित वेळेत पूर्ण होतील, असे स्पष्ट केले. ध्वजारोहणाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार असल्याने त्यादृष्टीने वाह-तूक, सुरक्षा आणि अन्य व्यवस्थांचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दुष्काळाच्या काळात कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र पाणी सोडले जाणार नाही, असेही महाजन यांनी स्पष्ट केले. पिण्याच्या पाण्यासाठी दरवर्षीप्रमाणे मागणीनुसार पाण्याचे आवर्तन सोडले जाईल. गोदावरी नदीत यापुढे सांडपाणी सोडले जाणार नाही. शहरातील पाणीगळती रोखण्यासाठीही प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी शहरातील गटारांची स्वच्छता करून एकही गटार उघडे दिलणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले.