फलटणमधून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. आईच्या कुशीत असलेल्या चिमुकलीवर कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , शहरातील महात्मा फुले चौक परिसरात भटक्या श्वानाच्या हल्ल्यात अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. शॉपिंग सेंटरमधील आईस्क्रीम दुकानासमोर उघड्यावर आई-वडिलांसह झोपलेल्या चिमुकलीला आईच्या कुशीतून नेऊन भटक्या कुत्र्यांनी झुंडीने तोडून जीवे ठार मारले. ही घटना दि. ६ रोजी मध्यरात्री घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयूर मुन्ना शिंदे (वय २२, रा. वाठार फाटा, ता. फलटण) हे महात्मा फुले चौकातील शॉपिंग सेंटर परिसरात आईस्क्रीम दुकानासमोर पत्नी आणि मुलांसह झोपले होते. ६ नोव्हेंबरच्या रात्री साडेदहा ते ७ नोव्हेंबरच्या पहाटे साडेचार या कालावधीत ही घटना घडली. कुटुंबीय झोपेत असताना श्वानाने अवघ्या तीन महिन्यांच्या चिमुकलीला आईच्या कुशीतून अलगत नेले. त्यानंतर तिच्यावर हल्ला करत तिला गंभीर जखमी केले. जखमांमधून झालेल्या अतिरक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाला. चिमुकलीचे टोपणनाव ‘बाय’ असे होते. सकाळी मुलगी जवळ दिसली नाही. त्यानंतर शोधाशोध सुरू झाल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. मुलीच्या मृत्यूबाबत अन्य कोणताही संशय किंवा तक्रार नसल्याचे वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत नमूद केले आहे.
खरकट्या अन्नामुळे श्वानांची संख्या वाढतेय?
महात्मा फुले शॉपिंग सेंटर परिसरात चायनीज पदार्थांच्या विक्रीची अनेक दुकाने आहेत. यातील काही व्यावसायिक खरकटे अन्न परिसरातच, इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनाच्या इमारतीच्या बाजूला टाकत असल्याचे चित्र आहे. परिणामी या परिसरात भटक्या श्वानांची संख्या वाढत असल्याची चर्चा आहे. फलटण नगरपालिकेची घंटागाडी रोज सायंकाळी परिसरातील कचरा गोळा करण्यासाठी येते. मात्र, काही हॉटेल व्यावसायिक कचरा घंटागाडीत न टाकता उघड्यावर टाकत असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण होत आहे. अन्नाच्या शोधात भटके श्वान या परिसरात जमा होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.