पुढील महिन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीमध्ये एक नवा चेहरा सामील होऊ शकतो. सध्या उत्तर विभागाच्या कोट्यातून निवडकर्त्याचे पद रिक्त आहे. ते भरावे लागेल. यासाठी बीसीसीआयने नुकतेच अर्ज मागवले होते.
एका रिपोर्टनुसार, या पदासाठी निखिल चोप्रा, मिथुन मनहास आणि अजय रात्रा या तिघांनी अर्ज केले आहेत. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. अर्जांची छाननी आता होणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या चेहऱ्यांना क्रिकेट सल्लागार समितीसमोर मुलाखतीसाठी बोलावले जाईल. नवा निवडकर्ता 2024 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी समितीमध्ये सामील होईल, असे मानले जात आहे. नवी निवड समिती जूनमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी टीम इंडियाची निवड करेल.
भारतीय पुरुष संघाच्या निवड समितीमध्ये सध्या पश्चिम विभागातील दोन चेहरे आहेत. यात अजित आगरकर आणि सलील अंकोला यांचा समावेश आहे. नियमानुसार एका झोनमधून एकच निवडकर्ता असू शकतो. अशा स्थितीत अंकोला यांना पायउतार व्हावे लागणार आहे. त्यांची जागा भरण्यासाठी निखिल आणि मन्हास यांच्यात सिलेक्टर पदासाठी स्पर्धा होऊ शकते. रात्रा यांनी यापूर्वीही अर्ज केला होता पण निवड झाली नाही.
निवड समितीमध्ये सध्या कोणाचा समावेश?
अजित आगरकर सध्या भारतीय निवड समितीचा कार्यभार सांभाळत आहेत. 2023 मध्ये आशिया चषकापूर्वी त्यांची या पदावर निवड झाली होती. अंकोला, एस शरथ, सुब्रतो बॅनर्जी आणि शिवसुंदर दास सध्या त्याच्यासोबत निवड समितीचा भाग आहेत.
सिलेक्टर होण्यासाठी कोणते निकष?
टीम इंडियाचा निवडकर्ता होण्यासाठी किमान सात कसोटी किंवा 30 प्रथम श्रेणी सामने किंवा 10 वनडे आणि 20 प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव असावा. तसेच, रिक्त जागा भरण्याआधी पाच वर्षांपूर्वी खेळाडूने निवृत्ती घेतली असावी.
कोण आहेत चोप्रा आणि मनहास?
50 वर्षीय निखिल यांनी भारतासाठी एक कसोटी आणि 39 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी एकूण 46 विकेट घेतल्या. तसेच 61 प्रथम श्रेणी सामन्यात 151 बळी मिळवले आहेत. ते गेल्या काही वर्षांपासून समालोचन करत आहेत. 44 वर्षीय मिथुन मनहास भारताकडून खेळू शकले नाहीत, पण त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप नाव कमावले. दिल्लीकडून खेळताना त्यांनी 157 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 45.82 च्या सरासरीने 9714 धावा केल्या. तर 130 लिस्ट ए सामन्यात 4126 धावा केल्या. ते सध्या कोचिंगशी निगडीत आहे.