कॉमेडियन कपिल शर्मा त्याच्या शो आणि वादांमुळे चर्चेत राहतो. नेटफ्लिक्सवर कपिल शर्माचा नवा शो येणार आहे. त्याआधीच त्याला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. एका प्रकरणात कोर्टाने कपिल शर्माला दिलासा दिला आहे. कपिल शर्माविरोधातील याचिका ग्वाल्हेर कोर्टाने फेटाळून लावली आहे.
काय आहे प्रकरण?
दोन वर्षांपूर्वी 'द कपिल शर्मा शो'च्या एका एपिसोडमध्ये कोर्टरूमचा सीन दाखवण्यात आला होता. यादरम्यान, न्यायालयाचे कामकाज सुमारे 8 मिनिटे दाखवण्यात आले. यामध्ये कपिल शर्मा आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांनी कोर्ट रुममध्ये होणारी कार्यवाही दाखवली. यामध्ये कपिल एका वकिलाच्या भूमिकेत होता. कपिलच्या तोंडी दुहेरी अर्थाचा संवाद होता. त्याशिवाय, सातत्याने मद्याची मागणी करताना दाखवण्यात आले.
कपिलच्या विरोधात खटला दाखल करण्याची मागणी
अॅड. सुरेश धाकड यांनी शोचे निर्माते, कलाकार कपिल शर्माच्याविरोधात खटला दाखल करण्याची मागणी केली होती. या शोमुळे न्यायालय आणि कोर्टाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न झाला असल्याचे त्यांनी म्हटले. कपिल शर्मा शो हा दुहेरी अर्थाचे संवाद आणि महिलांवर कमेंट करतात. या शोमध्ये कोर्टरूममध्ये मद्य प्राशन केले जात असल्याचे दाखवण्यात आले. हा कोर्टाचा अपमान असून त्याविरोधात खटला दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठाने कपिल शर्माला मोठा दिलासा दिला. कोर्टाने यावेळी टिप्पणीदेखील केली.पोलिसांचा वापर प्रसिद्धी स्टंटसाठी करता येणार नाही, असेही न्यायालयाने वकील सुरेश धाकड यांना सुनावले.