भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांच्याविरोधात निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. आज सायंकाळी सहा वाजल्यापासून पुढील ४८ तास सुरजेवालांच्या प्रचार करण्यावर बंदी आणण्यात आली आहे. या ४८ तासांत सुरजेवाला हे बैठका, रोड शो, मुलाखती आणि प्रसारमाध्यमांत बोलू शकणार नाहीत. हरियाणाच्या कैथलमध्ये सभेला संबोधित करत असताना हेमा मालिनी यांच्यावर त्यांनी अभद्र टिप्पणी केली होती.
आम्हाला लोक आमदार, खासदार का बनवितात? आम्ही हेमा मालिनी तर नाही आहोत की चाटण्यासाठी बनवितात, असे वक्तव्य सुरजेवाला यांनी केले होते. आयोगाने यावर स्पष्टीकरण मागितले होते. सुरजेवालांनी यावर हेमा मालिनी यांचा अपमान करायचा हेतू नव्हता किंवा त्यांना ठेच पोहोचविण्याचाही नव्हता. व्हायरल व्हिडीओमध्ये माझे वक्तव्य मोडून-तोडून पुढे करण्यात आले आहे, असे म्हटले होते. हेमा मालिनी यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली होती. त्यांना जे काही बोलायचेय ते बोलुद्यात, जनता माझ्यासोबत आहे. मला काही फरक पडत नाही. विरोधकांचे कामच वक्तव्ये करण्याचे असते. ते माझ्यासाठी चांगले तर बोलणार नाहीत, असे त्यांनी म्हटले होते.