लखनऊ- उत्तर प्रदेशातून हृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे. भांडणानंतर व्यावसायिकाने एका व्यक्तीला फाईव्ह स्टार हॉटेलच्या टेरेसवरुन ढकलून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. अधिक धक्कादायक म्हणजे एका व्यक्तीला टेरेसवरुन ढकलल्यानंतर उद्योगपती दुसऱ्या एका व्यक्तीला देखील टेरेसवरुन ढकलून देण्याचा प्रयत्न करतो.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका प्री-वेडिंग पार्टीसाठी पीडित आपल्या मित्रांसोबत हॉटेलमध्ये आला होता. पीडित व्यक्तीचे नाव सार्थक अग्रवाल आहे तो हेल्थ सेक्टरमधील व्यावसायिक आहे. त्याच्यासोबत रिधिम अरोरा हा देखील होता. रिधिम अरोरा याचे वडील संजीव अरोरा यांनीच सार्थकला टेरेसवरुन ढकलून दिलंय.
बरेलीतील एका हॉटेलमध्ये मित्रांमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. भांडणानंतर रिधिम याने आपले वडील संजीव यांना फोन केला. संजीव तेथे आला त्यावेळी सार्थक त्याच्या पाया पडत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय. पण, आरोपी सार्थकच्या कॉलरला पकडतो आणि त्याला मारहाण सुरु करतो. त्यानंतर त्याला ढकलत नेऊन टेरेसवरुन ढकलून देतो. आरोपी कापड व्यापारी आहे.
रविवारी सकाळी दोन वाजताचा हा प्रकार आहे. आरोपी संजीव सार्थकला टेरेसवरुन ढकलून दिल्यानंतर थांबत नाही. दुसऱ्या एका व्यक्तीला तो मारहाण सुरु करतो. एकाने मध्यस्थी केल्याने तो त्याला सोडून देतो.
सदर घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित सार्थक याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या त्याची प्रकृती नाजूक आहे.
सार्थक अग्रवालचे वडील संजय अग्रवाल यांनी असा दावा केलाय की, आरोपी किंवा त्याचा मुलगा याच्याशी माझ्या मुलाचा काहीही संबंध नाही. ते लोक कोण आहेत हे आम्हाला माहिती नाही. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मद्याच्या अमलाखाली होता. कोणत्याही चिथावणीशिवाय त्याने हल्ला केला. याप्रकरणी गुन्हा दखल करण्यात आलाय.