धक्कादायक! मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन ; चार्जशीटमधून खुलासा
धक्कादायक! मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन ; चार्जशीटमधून खुलासा
img
दैनिक भ्रमर
मणिपूरमध्ये गेल्या वर्षी झालेल्या जातीय हिंसाचाराची धक्कादायक बाजू समोर आली आहे. विवस्त्र करून रस्त्यावर धिंड काढलेल्या कुकी समाजातील महिलांना पोलिसांनीच जमावाच्या स्वाधीन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुन्हेगारांपासून पळून गेल्यानंतर महिला पोलिसांकडे मदतीसाठी गेल्या असता सुरक्षारक्षकांनी त्यांना गुन्हेगारांच्या ताब्यात दिल्याचे सीबीआयच्या आरोपपत्रात उघड झाले आहे. आरोपपत्रात दावा करण्यात आला आहे की, पोलिसांनी महिलांना त्यांच्या वाहनातून 100 मेईतेई दंगलखोरांच्या जमावाकडे नेले.

गेल्या वर्षी मणिपूरमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. यादरम्यान कुकी समाजातील दोन महिलांना मेईतेई समाजातील दंगलखोरांनी नग्नावस्थेत रस्त्यावर धिंड काढली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मणिपूरमधील जातीय हिंसाचार दाखवणारा हा व्हिडिओ या घटनेनंतर बराच काळ चर्चेचा विषय ठरला. या संपूर्ण घटनेवर सीबीआयने आपल्या आरोपपत्रात मोठा खुलासा केला आहे. सीबीआयने आरोपपत्रात म्हटले आहे की, दोन्ही महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यापूर्वी त्यांना विवस्त्र करून त्यांची परेड करण्यात आली. राज्यात जातीय हिंसाचार सुरू असताना ही घटना घडली.

कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या पत्नीचाही समावेश

आरोपपत्रात म्हटले आहे की, तिन्ही पीडितांनी घटनास्थळी उपस्थित पोलिसांकडे मदत मागितली होती, परंतु त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. आरोपपत्राचा तपशील देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, पीडित महिलांपैकी एक कारगिल युद्धात काम केलेल्या सैनिकाची पत्नी होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, महिलांनी पोलिसांना वाहनात सुरक्षित ठिकाणी नेण्यास सांगितले होते, परंतु पोलिसांनी कथितपणे त्यांना सांगितले की त्यांच्याकडे वाहनाच्या चाव्या नाहीत आणि त्यांनी कोणतीही मदत केली नाही.

मणिपूरमध्ये गेल्या वर्षी ४ मे घडलेल्या घटनेच्या जवळपास दोन महिन्यांनंतर, जुलैमध्ये हा हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये दोन महिलांना पुरुषांच्या जमावाने घेरले होते आणि त्यांना नग्न केले जात होते. सीबीआयने गेल्या वर्षी १६ ऑक्टोबर रोजी गुवाहाटी येथील विशेष न्यायाधीश सीबीआय न्यायालयात सहा आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group