मनमाड रेल्वे स्थानकातून आबू सालेमला पोलीस बंदोबस्तात नाशिकरोड कारागृहात आणले
मनमाड रेल्वे स्थानकातून आबू सालेमला पोलीस बंदोबस्तात नाशिकरोड कारागृहात आणले
img
दैनिक भ्रमर

मनमाड (नैवेद्या बिदरी) :- मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी गँगस्टर अबू सालेमला दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यासाठी गुरुवारी (दि. १) मध्यरात्री रेल्वेने दिल्ली येथे सशस्त्र पोलिस बंदोबस्तात नेण्यात आले होते.

दिल्ली येथील कामकाज संपल्यानंतर सालेमला रेल्वेतील राखीव बोगीतून मनमाड रेल्वे स्थानकावर आणण्यात आले येथून चांदवड मार्गे नाशिक रोड कारागृहात नेण्यात आले. अबू सालेम येणार असल्याने मनमाड रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात सशस्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेम यास मनमाड रेल्वे स्थानकावर नवी दिल्ली बेंगलोर कर्नाटक एक्सप्रेसने दिल्लीवरुन मनमाडला साडे एकोणाविस तासांचा रेल्वे प्रवास करून ३ : ४५ वाजता विशेष सशस्त्र सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात आणण्यात आले.

सालेम येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर मनमाड रेल्वे स्थानकावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. सालेमला मनमाड रेल्वे स्थानकावर उतरवून कडक सुरक्षा व्यवस्थेत चांदवड मार्गे नाशिकरॉड कारागृहात हलविण्यात आले. एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्याला गुरुवारी मध्यरात्री नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दिल्लीला नेण्यात आले होते.

सुनावणी पुढे ढकलल्यामुळे सुरक्षा यंत्रणेचे कष्ट वाया गेले. हत्या होईल अशी अबू सालेमला भीती असल्यामुळे त्याच्या सुरक्षेमध्ये शीघ्र कृती दलासह रेल्वे पोलीस, सुरक्षा बल आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. काही आठवड्यांपूर्वीच नवी मुंबईच्या तळोजा कारागृहातून नाशिक मध्यवर्ती कारागृहात अबू सालेम यास दाखल करण्यात आले होते. सालेम सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असून इतरही गंभीर स्वरुपाचे खटलेही प्रलंबित आहेत.

त्यातील काही खटल्यांची सुनावणी दिल्ली येथील न्यायालयात सुरू आहे. गुरुवारी (ता. १) पहाटे कडेकोट बंदोबस्तामध्ये रेल्वेने दिल्ली येथे नेण्यात आले. शुक्रवारी (दि. २) सर्वोच्च न्यायालयात हजर करण्यात आले. सालेमच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा मोठा सशस्त्र बंदोबस्त ठेवण्यात आला  होता. 

अबू सालेमला बघण्यासाठी प्रवाशांची उत्सुकता
मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी गँगस्टर अबू सालेमला मनमाडला आणले जाणार याबाबत पोलिसांकडून कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती. सालेम येणार असल्याने मनमाड रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा बल आणि स्थानिक पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. प्रत्येक फलाटावर, दादरावर आणि स्थानका बाहेर पोलीस दिसत असल्याने नेमके झाले तरी काय याची उत्सुकता प्रवाशांमध्ये दिसून आली.

मात्र कोण येणार की जाणार याची कुठलीही माहिती प्रवाश्यांना व इतरांना नव्हती. मात्र फलाट क्रमांक चार वर कर्नाटक एक्सप्रेस आली आणि त्यातील दुसऱ्या बोगीतून सुरक्षा करणारा मोठा बंदोबस्त बाहेर पडल्यावर प्रवाशांना समजले की कुख्यात गँगस्टर अबू सालेम याला घेऊन जाणार आहे. त्यामुळे सालेमला पाहण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group