रशिया आणि युक्रेनमधील युद्ध जवळपास अडीच वर्षे लोटली तरी अद्याप सुरू आहे. तसेच सध्या अनिर्णितावस्थेत असलेल्या या युद्धामध्ये आता युक्रेनने रशियावर जबरदस्त पलटवार करण्यास सुरुवात केली आहे. 
दरम्यान, आज युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. युक्रेनने रशियाच्या सारातोव्ह परिसरामध्ये एका बहुमजली इमारतीवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रमाणे भासणारा हल्ला करून युक्रेनने रशियामध्ये खळबळ उडवून दिली आहे.
या युद्धाच्या सुरुवातीच्या काळात रशिताने युक्रेनमधील बहुतांश भाग तुफानी हल्ले करून बेचिराख करून टाकला होता. मात्र नंतर युक्रेनने चिवटपणे लढून रशियाला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली होती. त्यात मागच्या काही दिवसांपासून युक्रेनकडून रशियावर सातत्याने ड्रोनच्या माध्यमातून हल्ले केले जात आहेत. 
दरम्यान, आज रशियावर जबरदस्त प्रहार करत युक्रेनने रशियाला या युद्धात सहजासहजी बाजी मारू देणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र या हल्ल्याची युक्रेनला जबर किंमत मोजावी लागू शकते. असा दावा आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
 तसेच या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून रशिया यु्क्रेनवर मोठा हल्ला करू शकतो. दरम्यान, युक्रेनने मागच्या आठवड्यात रशियावर असाच ड्रोन हल्ला केला होता. त्यावेळी युक्रेनने रशियाच्या दिशेने ४५ ड्रोन पाठवले होते. मात्र रशियाने हे सर्व ड्रोन नष्ट करून टाकले होते.