अंकिता वालावलकर ही बिग बॉस मराठीच्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे. कोकण हार्टेड गर्ल पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. अंकिता बिग बॉसच्या घरातही टास्कदरम्यान रणनीती आखताना दिसते. सध्या बिग बॉस मराठीचं घर गाजवणारी अंकिता गणेशोत्सवात घरी नसल्याने भावुक झाली आहे. बिग बॉसच्या घरातही गणपतीला गावी जायला मिळणार नसल्यने अंकिताला अश्रू अनावर झाले होते.
बिग बॉस मराठी’चा यंदाचा सिझन चांगलाच गाजतोय. या सिझनमधील स्पर्धक जितके बिग बॉसच्या घरातील खेळामुळे चर्चेत आहेत. तितकंच त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टही चर्चेत असतात. ‘कोकण हार्टेड गर्ल’ अर्थात सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता प्रभू वालावलकर… अंकिता सोशल मीडियावरही प्रचंड चर्चेत असते. तिच्या पोस्ट आणि व्हीडिओंची सोशल मीडियावर चर्चा होत असते. नुकतंच गणेशोत्सवानिमित्त अंकिताने एक खास पोस्ट शेअर केलीय. यात तिने तिच्या बाबांचा फोटो पोस्ट केलाय. आज मला तुमच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करायची आहे, असं अंकिता या पोस्टमध्ये म्हणाली आहे.
अंकिता सध्या ‘बिग बॉस मराठी’ च्या घरात आहे. मात्र घरात जाण्याआधी तिने तिच्या बाबांबद्दलच्या भावना लिहून ठेवल्या होत्या. आता तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ती खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. बाबा, आता ट्रॉफी आणि जावई घेऊनच येते घरी…, असं अंकिताने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या वर्षी अंकिता लग्न करणार होती. पण ‘बिग बॉस मराठी’ची ऑफर आल्यानंतर तिने लग्न थोडं पुढं ढकललं आहे. सोशल मीडियावरही तिने तिच्या जोडीदाराचा उल्लेख केला आहे.
अंकिताची इंस्टाग्राम पोस्ट
बाबा,
आतापर्यंत आपल्यात बरेच आंबट गोड खटके उडलेत. कधी तुम्ही चिडलात तर कधी मी रुसले. पण खरं सांगू बाबा कितीही मतभेद असले तरी तुम्ही आमच्यासाठी घेतलेली मेहनत आणि तुमचं प्रेम आम्हाला नेहमी दिसलं. आज ही कृतज्ञता मला व्यक्त करायची आहे.
लहानपणी मी ठरवलं होतं की मुलगी असून मी तुम्हाला कसलीच कमी कधी जाणवू देणार नाही. लहानपणी फटाक्यांसाठी हट्ट करायचो पण तुम्ही महाग म्हणून द्यायचा नाहीत आणि आता नेहमी फटाके घेऊन समुद्रावर येता आणि आम्ही वाजवत देखील नाही.तुमच्या हातातली ती फटाक्यांची पिशवी कायम भरलेलीच असते.नेहमी गणपतीत माझी गडबड असायची कोण पाट उचलणार,विसर्जन च्या वेळी कोणी असेल ना? कारण मुलगी म्हणून इथे मी नेहमी कमी पडले. शाडू मातीची २-३ फुट उंचीची मूर्ती उचलणं मला जमण्यासारखं नाही आणि नव्हत.पण बिग बॉसच्या घरात असताना देखील खूप आधी मी हया सगळ्याची व्यवस्था करून आलेय,तुम्हाला काळजी करावी लागणार नाही,७ व्या दिवशी माझे मित्र नक्की घरी येतील आणि मूर्ती विसर्जनाला मदत करतील. काळजी करू नका. गेल्यावर्षी बाप्पासोबत रात्री गप्पा मारल्या होत्या मी जेव्हा सगळे झोपले होते,आता मी ट्रॉफी आणि जावई घेऊनच येते घरी…