पुणे : ड्रीम इलेव्हन याऑनलाईन फँटसी गेममुळे पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षकाचे नशीब उजळले. या क्रिकेटप्रेमी उपनिरीक्षकाला तब्बल दीड कोटी रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून मिळाली असल्याचे वृत्त समोर आले होते. आता मात्र, या करोडपती पोलीस उपनिरीक्षकाची चौकशी होणार आहे.
पोलीस उपायुक्त ही चौकशी करणार आहेत. ऑनलाईन गेमिंगमध्ये तरुणाई भरकटत चालली आहे, अशात अनेकदा फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर आलेत. असे असताना पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांना ड्रीम 11 खेळण्याचा मोह आवरला नाही. मंगळवारी इंग्लंड विरुद्ध बांग्लादेश सामन्यात याच ड्रीम 11 मुळे त्यांना दीड कोटींची रक्कम बक्षिस म्हणून मिळाली. यामुळे ते चांगलेच प्रसिद्धीझोतात आले अन् आता अडचणीतही आले.
प्रशासकीय तसेच कायदेशीर बाबी तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पिंपरी चिंचवड पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या चौकशीत त्यांच्यावर काही कारवाई होते की हा केवळ कारवाईचा फार्स ठरतो, हे लवकरच कळणार आहे.
क्रिकेट वेड असलेल्या झेंडेंनी विश्वचषकातील खेळाडूंचा अभ्यास करत ड्रीम इलेव्हनवर त्यांनी टीम तयार केली होती. योगायोगाने ती टीम अव्वल आल्याने ते क्षणार्धात करोडपती झाले. झेंडे यांनी बक्षीस जिंकल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. जिंकलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झाली आहे.