सध्या इस्रायलची स्थिती खुपच बिकट झाली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी पॅलेस्टाईन दहशतवादी संघटना हमासने रॉकेट हल्ले केल्यानंतर इस्रायलनेही प्रत्युत्तर दिले आहे. दोन्ही देशांमध्ये घमासान युद्ध सुरु असून या युद्धात अनेक नागरिक ठार झाले आहेत. हमास या दहशतवादी संघटनेने गाझा पट्टीवर शेकडो क्षेपणास्त्र डागून हजारो इस्रायल नागरिकांचे प्राण घेतले आहेत. तर, त्या प्रत्युत्तरात इस्रायलनेही हल्ले चढवल्याने अनेक पॅलेस्टाईनी नागरिकांचाही जीव गेला आहे.
दरम्यान, या दोन्ही देशांमधील युद्धात असंख्य भारतीय अडकून पडले आहेत. त्यांना भारतात परत आणण्यासाठी मोदी सरकारने ऑपरेशन अजय सुरू केले आहे. या ऑपरेशन अंतर्गत इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावरून २१२ भारतीयांना घेऊन पहिल्या विमानाने गुरुवारी रात्री भारताच्या दिशेने उड्डाण भरले.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हे विमान दिल्लीत दाखल झाले आहेत. यामध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलांसह एकूण २१२ भारतीयांचा समावेश आहे. मायदेशात परताच या भारतीयांनी सुटकेचा श्वास सोडला असून मोदी सरकारचे आभार मानले आहेत. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिल्ली विमानतळावर या नागरिकांचे स्वागत केले आहे.
७ ऑक्टोबर रोजी युद्ध सुरू झाल्यानंतर, एअर इंडियाने इस्रायलमधून आपली सर्व उड्डाणे तात्काळ बंद केली होती. त्यामुळे अनेक भारतीय नागरिक इस्रायलमध्ये अडकले होते. त्यांना भारतात परत आणण्यासाठी मोदी सरकारने ऑपरेशन अजय सुरू केले आहे. त्यासाठी गुरुवारपासून नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भारतीय नागरिकांसाठी हेल्पलाइन देखील सुरू करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, इस्रायलमध्ये सुमारे १८ हजार भारतीय वंशाचे लोक राहतात. त्यांना परत आणले जाणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ऑपरेशन अजय अंतर्गत भारत सरकार इस्रायलमधून ज्या लोकांना आणत आहे, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे भाडे घेतले जात नाही. दरम्यान, भारतात येणार्या विमानांमध्ये चढण्यासाठी इस्रायलमधील तेल अवीव विमानतळावर भारतीयांनी गर्दी केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.