नंदुरबार : विधानसभेत कोट्यावधीच्या विकासाच्या गोष्टी सत्ताधारी आणि विरोधकांकडून केल्या जात आहे. मात्र आज रस्ता नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वेहगीच्या बारीपाडा मधल्या एका गर्भवती महिलेचा रस्त्यात गर्भापत झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
रस्ता नसल्याने या महिलेला साडेआठ किलोमीटर बांबुची झोळी करुन मुख्य रस्त्यावर आणले जात होते. रुग्णवाहीका नसल्याने खाजगी गाडीतून पिपंळखुटाच्या रुग्णालायत आणले जात होत.
दरम्यान रस्त्यातच गाडी पाण्यातील चिखलात फसली. त्यामुळे या सर्व परिस्थीतीत बराच वेळ गेला. परिणामी रस्त्यातच महिलेचा पाच महिन्याचा गर्भपात झाला. यानंतर तिला पिपंळखुटा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती चांगली असल्याचे देखील डॉक्टरांनी सांगितले आहे.
या पाड्याला ग्रामपंचायत मातीचा रस्ता करुन देते. मात्र पावसाळ्यात हा रस्ता वाहून जात असल्याने पावसाळा आणि हिवाळ्यात रस्त्या अभावी असा जीवघेणा प्रवास महिलांना करावा लागत आहे.
नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने आजही जिल्ह्यातील अनेक गाव- पाड्यांपर्यंत पोहचण्यासाठी रस्ता नाही. यात वाहन जाणे तर दूरच. दरम्यान रस्ता नसल्याने पायपीट करतच रुग्णालयात पोहचावे लागते. तर गरोदर महिलांना तर अगदी बांबूची झोळी करून न्यावे लागत असते. असाच प्रकार आज झाला असून यात महिलेचा रस्त्यातच गर्भपात झाल्याचे प्रकार घडला आहे.