प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना 'विष्णुदास भावे गौरव पदक' पुरस्कार २०२३ जाहीर!
प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना 'विष्णुदास भावे गौरव पदक' पुरस्कार २०२३ जाहीर!
img
Dipali Ghadwaje
मराठी रंगभूमी गाजवणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. दामले यांनी रंगभूमीवर विविध प्रयोग यशस्वी करुन दाखवले. केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही मराठी नाटकांचा डंका वाजण्यात प्रशांत दामले यांचा मोठा वाटा आहे.

अशातच मराठी चित्रपट, नाटकसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार २०२३ जाहीर झाल्याची माहिती समोर आली आहे. पुरस्कार जाहीर होताच चाहत्यांनी दामले यांना शुभेच्छा देत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

काही दिवसांपूर्वी दामले यांना नाट्यसृष्टीतील आणखी एका प्रतिष्ठित पुरस्कारानं गौरविण्यात आले होते. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ मराठी नाट्यसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणून दामले यांच्याकडे पाहिले गेले आहे. दामले यांच्या अनेक नाटकांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. येत्या पाच नोव्हेंबर रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

गेल्या ४० वर्षात दामले यांनी १२ हजार ५०० पेक्षा नाट्यप्रयोग सादर केले आहेत. त्यांनी ३७ मराठी चित्रपट आणि २४ दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी पाच लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् केली आहेत.

दरवर्षी रंगभूमीदिनी नाट्य संमेलन अध्यक्षांच्या हस्ते पुरस्कार वितरित केला जातो. मात्र गेल्या तीन वर्षांपासून विविध कारणांनी नाट्य संमेलनाचे घोंगडे भिजत पडल्याने अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्याच हस्ते दोनवेळा पुरस्कार वितरण झाले.

यंदा ते कोणाच्या हस्ते होणार याचा निर्णय दोन दिवसात घेण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. यावेळी कार्यवाह विलास गुप्ते, कोषाध्यक्ष मेघाताई केळकर, सदस्य जगदीश कराळे, बलदेव गवळी, आर्किटेक्ट विवेक देशपांडे, नाट्य परिषदेचे सदस्य मुकुंद पटवर्धन उपस्थित होते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group