ठरलं : साखर कारखान्याचं धुराडं 1 नोव्हेंबरला, मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय
ठरलं : साखर कारखान्याचं धुराडं 1 नोव्हेंबरला, मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय
img
Dipali Ghadwaje
मुंबईत मंत्रीमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत यंदाचा ऊसाचा गळीत हंगाम 1 नोव्हेंबर पासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावर्षी 89 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

दरम्यान, यावर्षी दरवर्षीपेक्षा कमी ऊसाच्या उत्पादनाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. यावर्षी 89 लाख मेट्रिक टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. ऊसाच्या उत्पादनात मागील वर्षाच्या तुलनेत पाच टक्के घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळं साखर उत्पादनात देखील यावर्षी काही प्रमाणात घट होणार आहे. 

राज्यात साखर हंगाम सुरु करण्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह होते. ऊसाचे घटलेले उत्पादन आणि चाऱ्यासाठी होत असलेला वापर बघता गाळप हंगाम 15 ऑक्टोबरला सुरु करण्याची आवश्यकता काही जणांनी केली होती. तर दुसरीकडे लवकरच हंगाम सुरु केल्यास ऊसाला योग्य उतारा मिळणार नाही आणि त्यातून शेतकरी आणि कारखान्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता असल्यानं हंगाम 15 नोव्हेंबरपासून सुरु करावा, अशी मागणी देखील करण्यात आली होती. पण अखेर आज अंतिम निर्णय झाला असून 1 नोव्हेंबर पासून ऊसाचे गाळप सुरु होणार आहे.  

यंदा राज्यात पावसाचं प्रमाण कमी राहिलं आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. याचा परिणाम ऊसाच्या उत्पादनावर होणार आहे. त्यामुळं मागील हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पावसाअभावी ऊसाचे घटलेले क्षेत्र, विविध साखर कारखान्यांनी वाढवलेली क्षमता यामुळं यावर्षी ऊस गाळप हंगाम कसाबसा केवळ तीन महिने चालण्याची शक्यता आहे. देशातील साखर उत्पादनापैकी सुमारे एक तृतीयांश साखर उत्पादन महाराष्ट्रात होते. नोव्हेंबर ते जानेवारी हे तीन महिने ऊसाचा गळीत हंगाम चालणार आहे. यंदा उत्पादनात मोठी टक्के घट होण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुऱ्हाळघरे आणि खांडसरी सुरू झाल्या आहेत. अनेक शेतकरी आपला ऊस गुऱ्हाळघरे आणि खांडसरीला पाठवत आहेत. जर राज्यातील गाळप हंगाम उशिरा सुरु झाला तर काही शेतकरी तोपर्यंत गाळपासाठी अन्य पर्याय स्वीकारु शकतात. त्याचा फटका साखर कारखान्यांना बसू शकतो.


 

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group