आदिवासी बांधवांना वनपट्टे नावावर करून द्यावे, शेतमालाला हमीभाव मिळावा, आशा, अंगणवाडी सेविकांना किमान वेतन द्यावे, अशा विविध मागण्यांसाठी सुरगाणा ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाने आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे.
दरम्यान आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडलेल्या आंदोलकांनी आतापर्यंत २२५ पोती तांदळाचा भात शिजवला आहे. कधी दाळ-भात, तर कधी खिचडी अन् पांढऱ्या भातासोबत वांग्याची भाजी असे दररोज दोन वेळ जेवणासाठी सुमारे पाच हजार आंदोलकांना दिवसाला २५ पोती तांदूळ लागतो. अन्न शिजविण्यासाठी गावनिहाय ३८ चुली, गॅस शेगड्यांची व्यवस्था केलेली असून पुढील चार दिवस पुरेल एवढा लवाजमा आंदोलकांनी करून ठेवला आहे.
शहरातील मुख्य रस्ता असलेल्या सीबीएस ते अशोक स्तंभ या मार्गावरील ‘स्मार्ट’ रस्त्यावर आंदोलकांनी गेल्या सोमवार (ता.२६) पासून दुतर्फा ठिय्या मांडला आहे. या सर्व आंदोलकांची तालुकानिहाय त्यांची हजेरी घेण्याची जबाबदारी माकप प्रणीत किसान सभा, सीटू, जनवादी महिला मंडळ, डीवायएफआय व एसएफआय या संघटनेचे सचिव व तालुकाध्यक्षांवर सोपवण्यात आली आहे. त्यांच्यावरच जेवणाच्या व्यवस्थेची जबाबदारीही आहे.
प्रत्येक तालुक्यातून तांदूळ, बाजरी व नागलीच्या भाकरी, चटणी मागवली जाते. प्रत्येक आंदोलकाने पाच, दहा किलो तांदूळ जमा केले आहेत. यातून दररोजच्या जेवणाची व्यवस्था होत आहे. साधारणतः: ५०० लोकांना एकवेळ जेवणासाठी ५० किलो तांदळाचा भात लागतो. दोन वेळेच्या जेवणासाठी अंदाजे तांदळाचा एक कट्टा रिकामा होत आहे.
दरम्यान अन्न शिजविण्यासाठी मांडण्यात येणाऱ्या चुलीचे दगड, लाकडी सरपणही त्यांनी गावाकडून आणले आहेत. ‘स्मार्ट रोडवर’च ३८ चुलींतून धुर निघतो आहे तर गॅस शेगडीचीही व्यवस्था केली आहे. रस्त्यावरच पंगती बसतात. पाण्याची व स्वच्छतेची व्यवस्था महापालिकेने चोख बजाविली आहे. ‘वॉटरग्रेस’चे १६ स्वच्छतादूत येथे साफसफाई करत असल्याने परिसर स्वच्छ राखला जात आहे.
दरम्यान आंदोलकांना अन्नधान्याचा तुटवडा जाणवताच दोन व्यक्तींना गावाकडे पाठवून पुरेसे तांदूळ, मीठ, मिरची मागवली जाते. भाजीपाल्याची खरेदी नाशिक बाजार समितीतून होते. तर नांदगाव, येवला या भागातील लोकांनी बाजरी, ज्वारी व नागली पीठच सोबत आणले आहे. त्याच्या भाकरी बनवतात. पुढील चार दिवस पुरेल एवढा साठा आंदोलकांनी करून ठेवला आहे. याची वेळोवेळी खातरजमा करून घेतली जाते.