भाजप आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांना टार्गेट करताना अभिनेत्री प्राजत्ता माळीवर उपहासात्मक टीका केली होती. या प्रकरणावरून प्राजक्ता माळीने नाराजी व्यक्त करत अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे गंभीर असल्याचे तिने सांगितले. दरम्यान , प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेऊन या सर्व प्रकरणावर मौन सोडलं
यावेळी बोलताना ती म्हणाली आज सकाळीच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी त्यांची वेळ घेण्यासाठी फोन केला होता. फोनवर आमचे बोलने देखील झाले. त्यांनी देखील मला हेच सांगितले की, अशा प्रकारचे नॉनसेन्स मी कधीच मान्य करणार नाही. मी तुम्हाला पत्रकार परिषद घेण्यापासून रोखणार नाही. तुम्ही जा आणि पत्रकार परिषद घ्या. याबाबत मी आधीच सुरेश धस यांच्याशी बोललो आहे. अशा प्रकारचा मूर्खपणा आम्ही कोणीच मान्य करून घेणार नाही. मी प्रत्यक्षात भेटून त्यांच्याशी याबद्दल बोलणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचे प्राजक्ता म्हणाली.
अशा प्रकरणात एखादी व्यक्ती माफी मागते आणि पुढे जाते. पण अशा प्रकारची घटना या पुढे कधीच होऊ नये यासाठी कारवाई झाली पाहिजे असे तिने सांगितले.या प्रकरणी आपण राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. या गोष्टीवर कारवाई झाली पाहिजे आणि यासाठी कायदे आणि नियम झाले पाहिजेत अशी मागणी आपण महिला आयोगाकडे केल्याचे प्राजक्ता म्हणाली.