बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला . राजकीय वातावरणही तापले आहे. दरम्यान या प्रकरणानंतर विरोधकांडून जोरदार रोष व्यक्त जात असून धनंजय मुंढे यांच्यावर टीका केली जात आहे. याच दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेत भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमधील कार्यक्रमात धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. दरम्यान, या प्रकरणी प्राजक्ता माळीने कठोर पाऊल उचलत सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार नोंदवली होती.
दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अभिनेत्री प्राजक्ता माळीने काल म्हणजेच २८ डिसेंबरला पत्रकार परिषद घेत या सगळ्या प्रकारावर आपला रोष व्यक्त केला. “सुरेश धस तुम्ही माझाच नाही तर सर्व महिलांचा अपमान केला आहे. तुम्ही माझी माफी मागा”, अशी मागणी प्राजक्ताने केली आहे.
“ही बाब फक्त माझ्यापुरती निगडीत राहिलेली नसून माझ्या कुटुंबियांनाही याचा त्रास होत आहे” असं म्हणत पत्रकार परिषदेत प्राजक्ता माळी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, या प्रकरणी प्राजक्ता माळीने कठोर पाऊल उचलत सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार नोंदवली होती. यावर आता महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आयोगाच्या वतीने प्रतिक्रिया दिली आहे.
रुपाली चाकणकर यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे, “अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची तक्रार आयोग कार्यालयास प्राप्त झाली आहे. त्याचा अभ्यास करून, कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आयोग करेल. महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान ठेवलं पाहिजे,कारण संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे सर्व क्षेत्रांमध्ये महिला स्वतःच्या कर्तुत्वावर काम करत आहेत आणि काम करत असताना समाज माध्यमांद्वारे केवळ त्या महिला आहेत म्हणून कोणताही पुरावा नसताना माध्यमांमध्ये त्यांच्या बाबतीत बदनामी करणारे वक्तव्य व त्याआधारे समाज माध्यमात सर्व घटकांनी शहानिशा न करता अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करणे याबाबत शासनाकडून कठोर कारवाई करणे बाबत आयोग पुढाकार घेईल.”