सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी धनंजय मुंढे यांच्यावर टीका करताना आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी हिच्यावर टिप्पणी केल्यानंतर या प्रकरणावरून प्राजक्ता माळी हिने रोष व्यक्त करत पत्रकार परिषद घेतली आणि सुरेश धस यांनी माफी मागावी असे सांगितले. तसेच, प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. अखेर या सगळ्या घडामोडींनंतर सुरेश धस यांनी दिलगिरी व्यक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
माझ्याकडून कोणतेही चुकीचे वाक्य गेलेले नव्हते. मात्र माझ्या वक्तव्याने कुणाची मने दुखावली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे चित्रफीत प्रसिद्ध करून सुरेश धस यांनी सांगितले. ग्रामीण भाषेत मी बोललो मात्र काही जणांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला, असे सुरेश धस म्हणाले.
माझे वक्तव्य नीट ऐकले तर प्राजक्ता माळी यांना मी ताई म्हटले होते. परंतु तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला, पण आता माझ्या दिलगिरीनंतर हा विषय संपवून टाकावा, असे आवाहन धस यांनी करत वादावर पडदा टाकण्याची विनंती केली.