डम्परने महिलेला चिरडले ग्रामस्थांचा चालकास चोप : कुंडाणेत तणाव
डम्परने महिलेला चिरडले ग्रामस्थांचा चालकास चोप : कुंडाणेत तणाव
img
दैनिक भ्रमर
अभोणा : नांदुरीहून अभोणाकडे भरधाव जाणाऱ्या खडी भरलेल्या डम्परने शनिवारी (दि. २८) कुंडाणे येथे रस्त्यालगत असलेल्या महिलेसह म्हशीला चिरडल्याने दोघांचाही मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी डम्परचालकाला चोप दिला. यावेळी काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली.

कुंडाणे येथील मंदिरासमोर विना नंबरप्लेट असलेल्या डम्परने विठाबाई रघुनाथ ढुमसे (५५, रा. कुंडाणे (क) यांच्यासह म्हशीला चिरडले. त्यात या महिलेसह म्हशीचा जागीच मृत्यू झाला.

ही म्हैस कैलास रघुनाथ ढुमसे यांच्या मालकीची होती. ग्रामस्थांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या वाहन चालकास चोप देण्यास सुरुवात केली. साहाय्यक पोलिस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी पथकासह परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक मिरखेलकर, कळवणचे उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी दाखल होत मृत महिलेचे नातेवाईक व संतप्त ग्रामस्थांशी चर्चा करीत शांतता राखण्याचे आवाहन केले. चालक अजय मांगु माळी (२१, रा. कापशी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group