राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार मागील आठवड्यात पडला असून मंत्र्यांचे खातेवाटप झाले आहे. त्यानंरतर आता राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्वच मंत्री जोरदार कामाला लागल्याचे चित्र आहे. दरम्यान, नुकतेच नवनिर्वाचित परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मुंबईकरांची ट्रॅफीक जाममधून सुटका करण्यासाठी मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील केबल टॅक्सी चालविण्याचा प्रस्ताव परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडला आहे.
पदभार सांभाळल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पहिलीच घोषणा मुंबईत केबल टॅक्ली चालविण्याची केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सोडवणूक करण्यासठी विविध पर्याय हाताळावे लागतील आणि केबल टॅक्सी हा एक त्यापैकी पर्याय आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
केबल टॅक्सी हा मुंबई महानगर क्षेत्रात परिवहनासाठी लोकप्रिय पर्याय होऊ शकतो. सध्या महाराष्ट्रात कोणत्याच ठिकाणी केबल टॅक्सी नाही.जर आपण १५ आसनी किंवा २० आसनांची केबळ टॅक्सी चालविली तर ट्रॅफीक जाम मधून सुटका होईल. जर आपण मेट्रो चालवू शकतो तर केबल टॅक्सी चालविण्यात कोणतीही समस्या नाही. कारण आपल्या ‘रोप वे’ उभारण्यासाठी जास्त जमीन लागणार नाही. केबल टॅक्सी महाराष्ट्र परिवहन विभागाच्या अंतर्गत चालायला हव्यात, त्यामुळे ही प्रणाली योग्य प्रकारे चालेल असेही प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
केबल टॅक्सी चालविण्याची योजना याआधी केबल बस नावाने देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मांडली होती. प्रताप सरनाईक यांनी देखील या संदर्भात नितीन गडकरी यांचे व्हिजन कामाला येईल असे म्हटले आहे.