अभिनेता अल्लू अर्जुनला हैद्राबाद पोलिसांकडून अटक करण्यात आलं आहे. गेल्या 4 डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ या चित्रपटाचा प्रीमिअर आयोजित करण्यात आला होता. यावेळी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांकडून अल्लू अर्जुनला अटक कऱण्यात आलं आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान, हैदराबादमधील एका थिएटरमध्ये चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी महिलेच्या कुटुंबाने एफआयआर दाखल केला होता. झालेल्या प्रकारानंतर अल्लू अर्जुनने मृत महिलेच्या कुटुंबाला 25 लाखांची मदतही केली.
अल्लू अर्जुनवर पोलिसांना न कळवता थिएटरमध्ये गेल्याचा आरोप आहे, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि एका महिलेचा मृत्यू झाला. यानंतर हैदराबाद पोलिसांनी भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 105 आणि 108 (1) अंतर्गत गुन्हा दाखल करत अल्लू अर्जुनला अटक केली. या घटनेनंतर सर्वच स्तरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
दरम्यान पुष्पा चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेल्या रश्मिका मंदानाने या घटनेवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. तिने एक्सवर एक पोस्ट लिहित तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली, “मी आत्ता जे पाहतेय त्यावर माझा विश्वास बसत नाहीये.. घडलेली घटना ही एक दुर्दैवी आणि अत्यंत दुःखद घटना होती. मात्र, सर्व काही एकाच व्यक्तीवर दोषारोप होत असल्याचे पाहून मी निराश झाले आहे. ही परिस्थिती अविश्वसनीय आणि हृदयद्रावक आहे.”
दरम्यान, अल्लू अर्जुनला अटक झाल्यानंतर मृत महिलेच्या पतीने ही केस मागे घेण्याची तयारी दाखवली आहे. मृत महिला रेवती हिचा पती भास्कर याने म्हटलं आहे की, “मी केस मागे घेण्यास तयार आहे. मला अटकेची माहिती नव्हती आणि ज्या चेंगराचेंगरीत माझी पत्नी मरण पावली त्याचा अल्लू अर्जुनशी काही संबंध नाही.”