राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महायुती सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान, आता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचं अजब कृत्य उघडकीस आले आहे. हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्या गाडीवर 18 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ल्याची घटना घडली होती. या संदर्भात कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु हा हल्ला नसून उमेदवाराला सहानुभूती मिळवण्यासाठी हल्ल्याचा बनाव केल्याचे पोलिसांच्या तपासात आता निष्पन्न झाले आहे. निवडणुकीत सहानभूती मिळवण्यासाठी हा बनाव केल्याचे समोर आले आहे. पोलीसात तपासात बिंग फुटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांची गाडी अडवून गाडीची तोडफोड करत मस्के यांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी ही मारहाण केली होती. यामध्ये डॉ. दिलीप मस्के यांना दुखापत झाली आहे. कळमनुरी ते हिंगोली रोडवरील लासीना फाटाजवळ रात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले. जखमी डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हिंगोली शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले होते.
दरम्यान , सुरुवातीपासूनच या प्रकरणात पोलिसांना काही वेगळ्या शंका उपस्थित होत होत्या. शेवटी पुरावे आणि खबऱ्यांमार्फत पोलिसांना माहिती मिळाली की उमेदवारानेच हे सगळे षडयंत्र रचले आहे. मारहाण झाल्यापासून संपूर्ण प्रकरण संशयास्पद वाटत होतं. तपासाअंती फिर्यादीच आरोपी निघाला आहे. लोकांची सहानुभूती मिळवत मते मिळवण्यासाठीच हा प्रकार केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. . याप्रकरणी पोलिसांनी वंचितचे पराभूत उमेदवार डॉ. दिलीप मस्के व त्यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे.