महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. ईव्हीएमवर सातत्याने संशय व्यक्त केला जात आहे. ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते, असा दावा देखील निवडणुकीदरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरला झाला होता. बशर सय्यद शुजा नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ तयार केला होता. याबाबत आता महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या तक्रारीवरून मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून ईव्हीएम (EVM) हॅक केल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मुंबई सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या तक्रारीवरून मुंबई सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दुसरीकडे, निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येणार नाही, असा पुनरुच्चार केला आहे. ही बाब समोर आल्यानंतर मुख्य निवडणूक कार्यालय महाराष्ट्राने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट देखील शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये, महाराष्ट्र निवडणूक कार्यालयाने लिहिले आहे की, ‘ईव्हीएमबद्दल खोटा दावा: काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती महाराष्ट्र निवडणुकीत ईव्हीएम हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याची वारंवारता बदलत आहे. ईव्हीएम हे खोटे आणि निराधार दावे आहेत.’
ज्या व्हिडिओवरून ही कारवाई करण्यात आली आहे, तो व्हिडीओ एका वृत्तवाहिनीच्या विशेष तपासाअंतर्गत समोर आला आहे. यामध्ये एक तरुण दावा करताना दिसत आहे की, तो ईव्हीएम हॅक करू शकतो आणि काही राजकीय पक्षांच्या बाजूने निकाल बदलू शकतो. अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते ईव्हीएम हॅक करू शकतात, असे त्याने सांगितले आहे. हा व्हिडिओ अनेक लोकांनी आणि काही राजकीय नेत्यांनीही शेअर केला आहे.