मोबाईलचा स्फोट झाल्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत. या घटनां मध्ये गंभीर दुखापत होऊन जखमी झाल्याचे प्रकार घडले आहेत तसेच काही घटनांमध्ये तर हा स्फोट चक्क जीवावर ही बेतल्याचे प्रकार घडले आहे. दरम्यान अशीच एक धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे.
या घटनेत मोबाईलच्या स्फोट होऊन एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सिरेगाव-सानगडी येथे केसलवाडा फाटा परिसरात घडली. सुरेश भिकाजी संग्रामे (रा. टोला सिरेगाव) असे मृताचे तर, नत्थू गायकवाड असे त्याच्यासोबत असलेल्या नातेवाईकाचे नाव आहे. दोघेही एकाच दुचाकीवरुन निघाले असता शुक्रवारी (6 डिसेंबर) सायंकाळी 6 च्या सुमारास सुरेशा यांच्या खिशात मोबाईल स्फोट झाला. ज्यामध्ये गायकवाड हे देथील मोठ्या प्रमाणावर जखमी झाले. घटनेमुळे परिसरात उडाली आहे. दरम्यान, मोबाईल कोणत्या कंपनीचा होता याबाबत माहिती मिळू शकली नाही.गडचिरोली जिल्हा परिषदेच्या देसाईगंज/वडसा पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कसारी येथे सुरेश भिकाजी संग्रामे हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. मोबाईल स्फोटामुळे झालेला त्यांचा मृत्यू त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे संकट घेऊन आला आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सिरेगाव-सानगडी गावचा आठवडी बाजार शुक्रवारी असतो. त्यामुळे सुरेश संग्रामे आणि नातेवाईक नत्थू गायकवाड हे दोघे या बाजारास गेले होते. दिवसभर बाजार करुन दुचाकीवरुन आपल्या गावी परतत असताना ते सिरेगाव टोलाकडे निघाले. दरम्यान, त्यांची दुचाकी सानगडी मार्गावरील केसलवाडा फाटा परिसरातत आली. सुरेश यांनी नेहमीप्रमाणे मोबाईल हा आपल्या शर्टच्या वरच्या खिशात ठेवला होता. मोबाईलचा अचानक स्फोट झाला. स्फोट इतका शक्तीशाली होता की, ज्यामुळे त्यांच्या अंगावरील कपडे तर जळालेच. पण छातीचा भागही मोठ्या प्रमाणावर भाजला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीने दवाखाण्यात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषीत केले.
मोबाईलचा स्फोट होताच सुरेश भिकाजी संग्रामे यांचे आपल्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले. ज्यामुळे अनियंत्रीत दुचाकी घसरली आणि अपघात घडला. यामध्ये संग्रामे जागीच ठार झाले. मात्र, त्यांच्यासोबत पाठिमागे बसलेले नत्थू गायकवाड हे देखील खाली पडले आणि अधिक प्रमाणावर जखमी झाले. त्यांना भंडारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, वैद्यकीय उपचार सुरु आहेत.