विधानसभेत महायुती सरकारला दणदणीत विजय मिळाला असून महाविकस आघाडीचा दारुण पराभव झाला. दरम्यान त्या नंतर विरोधकांकडून ईव्हीएमचा वविरोध करण्यात येत आहे. दरम्यान गुरुवारी राज्यात महायुती सरकार स्थापन झाले आहे. त्यांनतर राजकारणातील घडामोडींना वेग आला आहे.
दरम्यान, सत्तास्थापने नंतर आता आमदारांचे शपथविधी आणि विधानसभा अधयक्षांच्या निवडीकरिता तीन दिवसीय विशेष अधिवेशाला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आय लव्ह मारकडवाडी लिहिलेला फ्लेस झळकावला. त्यांच्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे देखील होते. ईव्हीएमवर मतदान न घेता मतपत्रिकेचा पुरस्कार केला पाहिजे, असे यातून विरोधकांना सुचवायचे होते. या सगळ्या कृतीवर अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.
महायुतीला इतके मोठे बहुमत मिळाले आहे की आता ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत आहे असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर माध्यमांशी बोलताना केला.
आम्ही महाविकास आघाडीमध्ये काम केले आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीनला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. लोकसभेला ईव्हीएमने ३१ जागा महाविकास आघाडीला दिल्या. त्यावेळी ईव्हीएम मशीन खूप चांगली होती. मात्र विधानसभेत महायुतीच्या बाजुने जनतेने कौल दिला तर ईव्हीएमला दोष द्यायला मविआने सुरुवात केली आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी विरोधकांना सुनावले
दरम्यान, लोकशाहीत प्रत्येकाला वक्तव्य करण्याचा अधिकार आहे. परंतु महाविकास आघाडीच्या आमदारांना शपथ घेण्याचा उद्याचा दिवस आहे. त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल. तरच त्यांना सोमवारी कामकाजात भाग घेता येणार आहे. याबाबतची माहिती सर्वांना आहे. परंतु पहिल्याच दिवशी आम्ही संख्येने कमी असलो तरी आम्ही काही वेगळ करतोय. त्यांचे अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रकार सुरू आहे असा खोचक टोलाही अजित पवार यांनी लगावला.