राज्यात महायुती सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, आता पहिल्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झालीय. दरम्यान, महाविकास आघाडीला आमदारांच्या शपथविधी आधी मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीतला मित्र पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने वेगळी वाट धरलीय. समाजवादी पार्टीचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी मविआतून बाहेर पडत असल्याचं सांगितलंय. मविआने ईव्हीएमचा निषेध करत आमदारकीच्या शपथविधीवर बहिष्कार टाकला. पण अबू आझमी यांनी शपथ घेतली. यानंतर त्यांनी आपण मविआतून बाहेर पडल्याचं सांगितलं. यामुळे मविआला मोठा धक्का बसला आहे.
धर्मासंदर्भात, विशिष्ट समाजाबद्दल बोलेल अशा लोकांसोबत आम्ही राहू शकत नाही. आम्ही कोणालाही पाठिंबा देणार नाही. आम्ही एकटेच राहू अशी स्पष्ट भूमिका समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांनी सांगितलं. शिवसेनेकडून कार्यकर्त्यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आवाज उठवण्यास सांगितलं जात आहे. तसंच बाबरी मशिद पाडणाऱ्यांचं अभिनंदन करणाऱ्यांसोबत समाजवादी पार्टी कधीच राहू शकत नाही. मविआने आज आमदारकीच्या शपथविधीवर बहिष्कार टाकला असला तरी अबू आझमी यांनी आमदारकीची शपथ घेतली. आपण मविआत राहणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
त्यांची मागणी ईव्हीएम हटवण्याची आहे. पंतप्रधान, निवडणूक आयोगाला विनंती आहे की शंका दूर करण्यासाठी त्यांनी ईव्हीएम संदर्भात चौकशी करायला हवी आणि ईव्हीएम हटवायला हवं असंही अबू आझमी म्हणाले. दरम्यान, मविआतून बाहेर पडल्यानंतर भाजप महायुतीच्या सरकारला पाठिंबा देणार का असं विचारलं असता अबू आझमी यांनी सांगितलं की, आम्ही दोघे एकटेच राहणार आहोत. भाजप महायुतीच्या सरकारला आम्ही पाठिंबा देणार नाही.