नाशिक - शहरातील पंचवटी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून अर्ध्या तासात पडलेल्या पावसामुळे पंचवटी परिसरातील काही भागांमध्ये लाईट गायब झालेली आहे तर अनेक भागांमध्ये पाणी साचल्यामुळे अडचणींचा सामना वाहनधारकांना करावा लागत आहे. नाशिक शहरात लागोपाठ दुसऱ्या दिवशी देखील पावसाने हजेरी लावली असून शहरातील पंचवटी परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे.
साडेआठ वाजेपासून पावसाला सुरुवात झाली असून एक तासापासून काहीसा जोर आणि काहीसा कमी प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे. पण मागील अर्ध्या तासापासून लागोपाठ पावसाने संततधार सुरू केली असून यामुळे पंचवटी परिसरामध्ये असलेल्या ड्रीम कॅसल, निमाणी परिसर, कोशिरा मळा, आडगाव नाका, हॉटेल मिरची परिसर, नांदूर नाका व लगतच्या परिसरामध्ये सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे या ठिकाणी पाणी साचलेले आहे. पंचवटीच्या महानगरपालिका शेजारी असलेल्या गोदावरी नदी पूल लगत पाण्याचा निचरा करण्यात आला. त्यानंतर परत संध्याकाळी सुरू झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.
नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर, राजीव गांधी भवन समोर तसेच मायको सर्कल, मुंबई नाका या परिसरात पावसाचा जोर नऊ वाजेपासून सुरू झाला असून या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे आणि त्यामुळे वाहतुकी वर देखील परिणाम झालेला आहे.