राज्यात महायुती सरकार स्थापन झाले असून गुरुवारी ५ डिसेंबर नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर लगेचच मंत्रिमंडळाची पहिली बैठक देखील पार पडली.
दरम्यान आज पासून विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. या अधिवेशनात आमदारांच्या शपथविधीसह विधानसभा अध्यक्षांची देखील निवड होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी उद्या दुपारी बारापर्यंत अर्ज करता येणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा भाजपकडून राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज करणार आहेत.
विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांचं नाव भाजपकडून जवळपास निश्चित झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत, त्यामुळे विधानसभा अध्यक्ष देखील आता भाजपचाच होणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, राहुल नार्वेकर हे मंत्रिपदासाठी इच्छूक होते, महायुतीमध्ये यावेळी आपल्याला मंत्रिपद मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. त्यामुळे आता ते उद्या विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.