सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव सध्या राजकारणाचं केंद्र बनलं आहे. या भागात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर हे विजयी झाले आहेत. पण तरीही मतदारसंघातील मारकडवाडी गावात भाजप उमेदवार राम सातपुते यांना जितके मतं मिळाली तेवढे सुद्धा मतदान झालेले नाही, असा दावा उत्तम जानकर आणि गावकऱ्यांचा आहे.
गावकऱ्यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे गावकऱ्यांनी खरं-खोटं सिद्ध करण्यासाठी गावात थेट बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला. पण प्रशासनाच्या दबावामुळे ते शक्य होऊ शकलं नाही.
यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे आज मारकडवाडी गावात पोहोचले. त्यांनी विरोधकांवर निशाणा साधत ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याबाबतचा संशय व्यक्त केला. त्यांच्या आरोपांवर आणि टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. बावनकुळे यांनी मतांची आकडेवारी ट्विट करत शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं.
“मारकडवाडी गाव हे शरद पवार किंवा उत्तमराव जानकरांची मक्तेदारी नाही. पवार साहेब, मारकडवाडी येथे झालेल्या मतांची आकडेवारी बघा म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल. शरद पवारांनी उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नये”, अशा शब्दांत बावनकुळेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘एक्स’वरून शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. “शरद पवार साहेब मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली. तुमच्या माहितीसाठी २०१४, २०१९ आणि २०२४ ची मतांची आकडेवारी देत आहे, जरा डोळे उघडून नीट वाचा. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांना ५३३ मतं मिळाली तर महायुतीतील घटकपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांना ६६४ मतं मिळाली होती. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हनुमंत डोळस यांना २९४ मते मिळाली तर अपक्ष अनंत खंडागळे यांना ९७९ मते मिळाली”, असं बावनकुळे म्हणाले.
“२०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ९५६ मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना ३९५ मतं मिळाली. मात्र त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीकडून लढलेल्या उत्तमराव जानकर यांना १३४६ मतं मिळाली तर भाजपाकडून लढलेल्या राम सातपुते यांना ३०० मतं मिळाली”, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.