राज्याच्या राजकारणातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. महायुतीचे समन्वयक आणि विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून, मनीष निकोसे नावाच्या इसमाने आमदार लाड यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ देखील केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार प्रसाद लाड यांनी याबाबत पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली असून, त्यानंतर देखील मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीने आमदार लाड यांना आज पुन्हा एकदा धमकी दिली. २ हजार लोकांसह तुझ्यावर हल्ला करेन, असे या धमकीत म्हटले आहे.
तसेच आपण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कार्यालयातून बोलतोय, तर कधी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून बोलत असल्याचे हा व्यक्ती सांगत आहे. सदर इसमाची कसून चौकशी करून त्याच्यावर धमकीचा गुन्हा दाखल करावा व त्यास अटक करावी अशी विनंती आमदार प्रसाद लाड यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.