बंगळुरु : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री सोमनहल्ली मल्लैया कृष्णा उर्फ एस एम कृष्णा यांचे निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रदीर्घ आजारानंतर मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बंगळुरुची 'सिलीकॉन व्हॅली' करण्यात त्यांचा मोठा हातभार होता. आयुष्याची पाच दशकं काँग्रेससोबत घालवल्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. एस एम कृष्णा यांनी भूषवलं नाही, असं संसदीय राजकारणातील क्वचितच एखादं पद राहिलं असेल.
एस एम कृष्णा यांनी मंगळवारी पहाटे २ वाजून ४५ मिनिटांनी त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव आज मद्दूर येथे नेले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या पश्चात पत्नी प्रेमा कृष्णा आणि दोन मुली - मालविका कृष्णा आणि शांभवी कृष्णा असा परिवार आहे.
प्रदीर्घ राजकीय कारकीर्द
एस एम कृष्णा यांचा राजकीय प्रवास प्रदीर्घ होता. लोकसभा आणि राज्यसभा सदस्यत्वासह त्यांनी मुख्यमंत्रिपद, राज्यपालपद आणि केंद्रीय मंत्रिपदही भूषवले आहे. त्यांनी कर्नाटकात काँग्रेसचे नेतृत्वही केले. विधान परिषद सदस्य, विधानसभा अध्यक्ष, उपमुख्यमंत्री, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि राज्यपाल म्हणून त्यांनी काम केले आहे.