राज्यात नुकतंच काही दिवसांपूर्वी विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं आणि भाजप नंबर एकचा पक्ष ठरला. भाजपला तब्बल 132 जागांवर विजय मिळाला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडावा लागला.
एकनाथ शिंदे यांनी आता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदासोबत गृहमंत्रीपदही हवं होतं. पण भाजप ते देण्यात तयार नव्हतं. अर्थात खातेवाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. पण भाजप शिंदेंना गृहखातं देण्यास तयार नसल्याची माहिती आहे.
या सर्व घडामोडी सुरु असतानाच आता एकनाथ शिंदे यांच्या पेजने उद्धव ठाकरे यांच्या पेजला फॉलो केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? अशी चर्चा सुरु आहे.
शिंदेंनी ठाकरेंच्या पेजला अनावधानाने फॉले केलं की महायुतीत हे शिंदेंचं दबावतंत्र आहे? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.
शिंदेंच्या फेसबुक पेजवरुन कुणाकुणाला फॉलो करण्यात आलंय?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक पेजला फॉलो करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन उद्धव ठाकरे यांना फॉलो करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या पेजवरुन केवळ चार जणांच्या पेजला फॉलो करण्यात आलं आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या पेजला फॉलो करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.