राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाले असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता सत्तास्थापनेनंतर महायुतीत खातेवाटपावरून हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, आता गृहखात्याच्या बदल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर तीन अन्य खात्यांचे पर्याय देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे गृहखात्यासाठी प्रचंड आग्रही आहेत. मात्र गृहखाते सोडण्यास भाजपची तयारी नाही. त्याच कारणामुळे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला शिंदे राजी नव्हते. आता शपथविधीनंतर भाजपकडून एकनाथ शिंदे यांना तीन पर्याय देण्यात आलेले आहेत.
गृहखात्याची मागणी केल्यानंतर आवश्यक तितका दबाव वापरूनही खाते मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाल्यावर गृहखात्याइतकेच महत्वाचे तोडीस तोड खाते मिळविण्याकरता शिवसेना आग्रही आहे. शपथविधीनंतर दोन्ही पक्षांत खातेवाटपावरून चर्चांना सुरुवात झाली आहे. गृहमंत्रालयाच्या बदल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर तीन अन्य खात्यांचा पर्याय देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. महसूल, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम यापैकी एक पर्याय शिंदे यांना निवडावा लागणार आहे. त्यांच्या सहकाऱ्यांना चांगली खाती मिळवून देण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर असणार आहे.