महिलेला विवस्त्र फोटो पाठवण्याचा प्रकरणावरून जयकुमार गोरेंनी  केला ''हा'' मोठा खुलासा
महिलेला विवस्त्र फोटो पाठवण्याचा प्रकरणावरून जयकुमार गोरेंनी केला ''हा'' मोठा खुलासा
img
दैनिक भ्रमर
राजकारणातील घडामोडींना वेग आला असून राजकारणात आरोप प्रत्यारोपाच्या खेळीचे सत्र सुरूच आहे. दरम्यान, आता एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवण्याचा आरोप होत असलेल्या मंत्री जयकुमार गोरे यांनी आज विधानसभेत त्यांच्यावर होणाऱ्या सर्व आरोपांना उत्तर दिलं आहे. 


“2017 मधील सातारा न्यायालयातील प्रकरण 479 चा आधार घेऊन त्या बाबत मीडियामधून माझ्यावर बिनबुडाचे, अश्लाघ्य, आक्षेपार्ह भाषा वापरुन बेछूट आरोप करण्यात आले. माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. माझी जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला. राज्याचा मंत्री म्हणून सभागृहात काम करताना चुकीच्या टीकेला तोंड द्यावं लागलं. सभागृहाच्या कामकाजावर परिणाम व्हावा अशी कृती जाणीवपूर्वक केली. सदर गुन्ह्यात न्यायालयाने 2019 मध्येच मुक्तता केली आहे. निकाल सोबत जोडला आहे. सर्व मुद्देमाला नष्ट करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. तसा सर्व मुद्देमाल नष्टही केला. न्यायालयाने निकालपत्र दिलं आहे, तरी संजय राऊत यांनी मीडियासमोर येऊन जाणीवपूर्वक माझी बदनामी केली. त्यामुळे त्यांनी माझा व सभागृहाचा विशेषधिकार भंग केला. न्यायालयाचा अवमान केला. सार्वभौम सभागृहाचा आपमान केला आहे. म्हणून मी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडतोय” असं जयकुमार गोरे म्हणाले.

“त्या सोबत एक युट्यूब चॅनल आहे लयभारी, त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून किमान 87 व्हिडिओ क्लिप बनवल्या. माझ्या, माझ्या कुटुंबाची, पक्षाची बदनामी केली. अत्यंत नीच, खालच्या पातळीवर जाऊन सातत्याने अडीच वर्षापासून हे चॅनल टीका करत आहे. या प्रकरणात न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणता आपण जबाबदारीने वागलं पाहिजे, भूमिका मांडली पाहिजे. भाषेचा स्तर राखला पाहिजे. माझी, माझ्या कुटुंबाची बदनामी होईल असं वर्तन या युट्यूब चॅनलने केलेलं आहे. त्या ‘लय भारी’ युट्यूब चॅनलच्या तृषार आबाजी खरात विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मी सभागृहात मांडत आहे” जयकुमार गोरे म्हणाले.

“सभागृहात माझी मुख्यमंत्री महोदयाना विनंती आहे की, संबंधित प्रकरण चालू झालं. राज्यपालांना कुणी निवेदन दिलं की, त्या संदर्भात ते निवेदन शासनाने पोलिसांकडे पाठवलं. त्यांनी चौकशी केली. ज्यांची निवेदनावर सही होती, त्यांनी एसपीला जबाब दिला की, संबंधित सही माझी नाही. मी तो अर्ज केलेला नाही” अशी माहिती जयकुमार गोरे यांनी सभागृहात दिली.

तसेच, “माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, राज्यपालांना खोट निवेदन देणं, एखाद्या कुटुंबाला, नेतृत्वाला आयुष्यातून उद्धवस्त करण्याचा प्लान करणं हे घातक आहे. या प्रकरणात मी जास्त काही बोलणार नाही. पण याच सभागृहात काही सदस्य आहेत, ज्यांना विधान परिषदेतील पराभव सहन झाला नाही. म्हणून माझ्याविरोधात षडयंत्र केलं” असा दावा जयकुमार गोरे यांनी केला. “जयकुमार गोरे दोषी असेल, तर त्याला फासावर द्या. पण अशा पद्धतीने अर्ज देणं, प्लान करणं. चौकशी केल्यावर संबंधित सांगतात की, मी अर्ज केला नाही. याची चौकशी झाला पाहिजे. कारवाई झाली पाहिजे” अशी मागणी जयकुमार गोरे यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group