राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून. विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणातील घडामोडींना वेग आला असून आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुंबईतील बंगल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास ही भेट झाली. साधारण तासभर जयंत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठक सुरु होती. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गेल्या काही दिवसांपासून भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता त्यातच जयंत पाटील यांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली. जयंत पाटील हे मध्यरात्रीच्या सुमारास चंद्रशेखर बावनकुळे मुंबईतील बंगल्यावर दाखल झाले. यानंतर साधारण तासभर त्या दोघांमध्ये बैठक झाली. मध्यरात्रीच्या सुमारास ही बैठक झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
यानतंर जयंत पाटील यांनी स्वत: या बातमीला दुजोरा दिला. चंद्रशेखर बावनकुळे आणि माझी भेट झाली. या भेटीमध्ये सांगलीच्या काही महसूल प्रश्नावर मी त्यांना जवळपास दहा ते बारा निवेदने दिली. ही निवेदन देण्यासाठी त्यांची भेट मागितली होती. सातबाऱ्याचं संगणकीकरण ऑनलाईन करण्यात आलं आहे. पण त्याच्या दुरुस्त्या अनेक शेतकऱ्यांच्या वेळेवर होत नाहीत. हा सर्व महाराष्ट्राचा प्रश्न आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.